Advertisement

शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटीचे 118 बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत

एकनाथ शिंदे यांनी सेवेत दाखल होण्याचे आदेश दिल्याने सदावर्ते यांनी त्यांचे आभार मानले.

शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटीचे 118 बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी महामंडळाने (MSRTC) 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. आजपासून हे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.

राज्य सरकारने सेवेत दाखल होण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांनंतर पुन्हा सेवेत घेतलं जाणार असून पूर्वीच्याच जागी आणि पदावर कामावर रुजू करुन घेतलं जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे.

गुरुवारपासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सरकारचे आभार मानले. तसेच सदावर्ते यांचे देखील आभार मानले.

एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिले होते. एसटी महामंडळासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. या कर्मचाऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला. एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी तब्बल 6 महिने एसटी संप सुरु होता. 23 डिसेंबरपर्यंत कर्तव्यावर येण्याचं आवाहन महामंडळाने केलं होतं. परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 118 कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्यात आलं होतं.



हेही वाचा

लक्ष द्या! मुंबईत ऑटो, टॅक्सीच्या भाड्यात 'इतकी' वाढ

बेस्टची ‘दिवाळी सुपर सेव्हर ऑफर’, 9 रुपयांत 5 फेऱ्यांचा लाभ!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा