Advertisement

महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच विविध उपक्रम राबवत असतं.

महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 'इतके' जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल होणार
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच विविध उपक्रम राबवत असतं. अशातच आता प्रवाशांच्या आणखी चांगली सुरक्षा मिळावी यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडील २०० जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक मुख्यालयाकडे पाठविला जाणार असल्याचं समजतं.

वाढलेली प्रवासी संख्या व लोकल फेऱ्याही वाढल्याने उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडील २०० जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे.

दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा संसर्ग कमी होताच रेल्वे प्रवासाबाबतचे नियम शिथिल करण्यात आले. यात दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. २ लसमात्रा घेऊन प्रवास करणाऱ्यांची संख्येत हळूहळू वाढ होत गेली. त्यामुळं अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच या प्रवाशांचीही भर पडल्यानं प्रवासी सुरक्षा व्यवस्थेवरील ताण वाढू लागला.

प्रवासी संख्या व लोकल फेऱ्या कमी असल्यानं महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातून काढून घेण्यात आले होते. मात्र आता प्रवासी संख्या वाढू लागली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये असलेली सरासरी १९ लाख १० हजार प्रवासी संख्या डिसेंबर २०२१ मध्ये २० लाख २१ हजारांपर्यंत पोहोचली. तर जानेवारीत २१ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करू लागले. 

या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे एक हजार जवान तैनात असतात. पादचारी पूल, उपनगरीय स्थानकातील फलाट, रेल्वे टर्मिनस, मुंबईतून सुटणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, कारशेड, यार्ड येथील सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यांच्याबरोबर आधी एमएसएफही होते, परंतु दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यावर आणि लोकल गाड्यांमुळे एमएसएफला राज्य सरकारकडून माघारी बोलावण्यात आले.

आता पुन्हा पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाला एमएसएफची गरज असून त्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत खरप यांनी दिली.

पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसाठी ४० बॉडी कॅमेराही सेवेत दाखल केल्याची माहिती खरप यांनी दिली. मुंबईतून सुटणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तैनात काही सुरक्षा दलाच्या जवानांना हे कॅमेरा देण्यात येतील. 

यात गुन्हेगाराला पकडण्यापासून विनाकारण हुज्जत घालणारे, विनातिकीट प्रवासी यांचे चित्रणही होईल. त्यामुळे आरोप सिद्ध करण्यासाठीही एक पुरावा सुरक्षा दलाच्या जवानांकडे राहणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा