Advertisement

बेस्टच्या ताफ्यात येणार २६ इलेक्ट्रीक बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २६ नवीन एसी इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या आहेत.

बेस्टच्या ताफ्यात येणार २६ इलेक्ट्रीक बस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २६ नवीन एसी इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचं लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. नरिमन पॉईंट, मुरली देवरा चौक या ठिकाणी या बसगाड्यांचे लोकार्पण झालं. 

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई सारख्या शहर भागात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात टाटा मोटर्सनं बनवलेल्या वातानुकूलित २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. 

बेस्टच्या ताफ्यात यापूर्वी बेस्टच्या मालकीच्या ६ इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल आहेत. या व्यतिरिक्त भाडं तत्त्वावरील ६६ इलेक्ट्रिक बसगाड्याही दाखल झालेल्या आहेत. एकूण ३५० इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळं येत्या काळात मुंबईकरांना प्रदूषणमुक्त प्रवास करायला मिळणार असून, इंधनाची देखील बचत होणार आहे.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रीक वेहिकल्स) इलेक्ट्रीक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम’कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज २६ बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.

'या इलेक्ट्रीक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बसेस सुरु असून एकूण ३४० बसेस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बसेस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रीक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर राहील याकडे लक्ष देण्यात येणार आहे', असेही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा