Advertisement

पश्चिम रेल्वेचा ताफ्यात ३ एसी लोकल; प्रवास होणार आणखी ‘गार’

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी गार होणार आहे.

पश्चिम रेल्वेचा ताफ्यात ३ एसी लोकल; प्रवास होणार आणखी ‘गार’
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी गार होणार आहे. कोरोनाकाळात पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात कोरोनाकाळात टप्प्याटप्यात ३ एसी लोकल दाखल झाल्या होत्या. सध्या लोकल प्रवासाची मुभा केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना व महिलांना असल्यानं त्या नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेत येतील, असं पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

या नव्या एसी लोकल विरार ते चर्चगेट मार्गावर चालविण्यात येणार आहेत. २५ डिसेंबर २०१७ मध्ये पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल झाली. त्यानंतर टप्प्याटप्यात या लोकल ताफ्यात येऊ लागल्या. डिसेंबर २०१९ पर्यंत पश्चिम रेल्वेवर ४ एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. चर्चगेट ते विरार मार्गावर लोकल चालवताना त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

कोरोनाकाळात या लोकल बंदच होत्या. नुकतीच ही सेवा पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. तरीही प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद आहे. ४ लोकल सेवेत असतानाच कोरोनाकाळात आणखी ३ लोकलही पश्चिम रेल्वेकडे आल्या आहेत. मार्चमध्ये ५वी, सप्टेंबरमध्ये ६वी आणि २ डिसेंबरला ७वी एसी लोकल दाखल झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली.

सध्या ४ लोकल सेवेत असून उर्वरित ३ लोकल कशा चालवायच्या याचं नियोजन सुरू आहे. दाखल झालेल्या ३ पैकी २ लोकल मार्च २०२१ पर्यंत, तर एक लोकल मार्चनंतरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचं समजतं. ७ महिन्यांपेक्षाही जास्त काळ पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल बंद होती. १५ ऑक्टोबरपासून एसी लोकल सुरू झाली. या लोकलच्या दिवसाला १२ फेऱ्या होतात. सध्या एसी लोकल गाडीला अल्प प्रतिसादच आहे.

नोव्हेंबर महिन्यापर्यंत १,०२३ तिकीट आणि ६६७ पासची विक्री झाली होती. डिसेंबरमध्ये ३३१ तिकीट आणि २२३ पासची विक्री झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली. एका एसी लोकलची प्रवासी क्षमता ५,९६४ आहे. परंतु, कोरोनाकाळात एका लोकलमधून ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. परंतु या एसी लोकल गाडीला त्याहीपेक्षा खूपच अल्प प्रतिसाद मिळत आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा