..आणि थोडक्यात बचावले 330 प्रवासी

 Mumbai
..आणि थोडक्यात बचावले 330 प्रवासी

मुंबई - मुंबईहून लंडनला निघालेल्या 330 प्रवाशांच्या काळजाचा ठोका त्यावेळी चुकला जेव्हा आकाशात लढाऊ विमानांनी त्यांना वेढा दिला. 16 फेब्रुवारीला जेट एअरवेजची फ्लाईट 9W 118 जर्मनीच्या आकाश हद्दीत पोचली आणि एकाएकी पाठून दोन लढाऊ विमानांनी या विमानाचा पाठलाग सुरू केला. काही क्षणातच ही लढाऊ विमाने फ्लाईट 9W 118 च्या शेजारून उडू लागली. ही दोन्ही विमानं जर्मन लष्काराची लढाऊ विमाने होती. जर्मन एयर स्पेसमध्ये फ्लाईट 9W 118 चा जर्मन एयर ट्रॅफिक कंट्रोलशी अचानक संपर्क तुटला ज्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. विमान दहशतवाद्यांनी ताब्यात घेतल्याचा संशय आल्याने अति संवेदनशीलतेचा इशारा देण्यात आला. फ्लाईट 9W 118 ला जर्मन लढाऊ विमानांनी गाठलं. दरम्यान लढाऊ विमानांनी वेढा देताच SOS चॅनलच्या साहाय्याने संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यात आला. जर्मन एअरफोर्सनं दाखवलेल्या तत्परतेमुळं मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, या घटनेची डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने चौकशी सुरू केली आहे. "मुंबईवरून लंडनला जाणाऱ्या जेट एयरवेजच्या फ्लाईट 9W 118 चा जर्मन एयरस्पेसमध्ये स्थानिक एटीसीशी संपर्क तुटला. काही मिनिटांतच संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यात आला. मात्र सावधगिरीचा उपाय आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी म्हणून जर्मन हवाई दलाने आपली विमाने पाठवली", अशी प्रतिक्रिया जेट एयरवेजकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोणत्याही दुर्घटनेविना 330 प्रवासी आणि 15 क्रू मेंबर्सना घेऊन हे विमान सुखरूप लंडनला उतरले.

Loading Comments