Advertisement

एसी लोकलचा प्रवास आजपासून स्वस्त

मध्य, तसेच पश्चिम उपनगरीय रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा प्रवास गुरुवार, ५ मेपासून स्वस्त होत आहे.

एसी लोकलचा प्रवास आजपासून स्वस्त
SHARES

मध्य, तसेच पश्चिम उपनगरीय रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलचा प्रवास गुरुवार, ५ मेपासून स्वस्त होत आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. शिवाय सामान्य लोकलच्या (विनावातानुकूलित लोकल) प्रथम श्रेणीचेही भाडेदर कमी करण्यात आले आहेत. मात्र वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीच्या पास दरात मात्र बदल करण्यात आलेला नाही.

वातानुकूलितच्या तिकीट दरात कपात केल्यानं चर्चगेट ते बोरिवलीचे सध्याचे तिकीट १८० रुपयांहून ९५ रुपये, तर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे भाडेदर १४० रुपयांवरून ८५ रुपये झाले आहे.

सीएसएमटी ते कल्याणपर्यंत वातानुकूलितचे तिकीट १०५ रुपये झाले आहे. पूर्वी हा दर २१० रुपये होता. या मार्गावरील प्रथम श्रेणीचे तिकीटही १६५ रुपयांऐवजी १०० रुपये आकारले जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

उपनगरीय रेल्वेमार्गावर पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेवर धावली. त्यानंतर मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा आणि सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव हार्बर मार्गावरही वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्या.

जादा भाडेदरामुळे या लोकल गाडय़ांना सुरुवातीपासूनच अल्प प्रतिसाद मिळत होता. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचेही भाडे दर कमी केले.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा तसेच सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव हार्बर मार्गावर सध्या वातानुकूलित लोकलच्या दररोज ६० फेऱ्या तर पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर २० फेऱ्या होतात.

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून एप्रिलमध्ये दररोज २२ हजार प्रवासी प्रवास करत असून मार्च २०२२ च्या तुलनेत ४३ टक्केच वाढ आहे. एप्रिलमध्ये पश्चिम रेल्वेला वातानुकूलित लोकलमधून दररोज १० लाख १३ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

एप्रिलमध्ये मध्य रेल्वेच्याही मुख्य तसेच हार्बरवरील वातानुकूलित लोकलमधून दररोज सरासरी २० हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असून ९ लाखांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.



हेही वाचा

मुंबई विमानतळावरून बेस्टची २४ तास सेवा

जूनपासून भाडेवाढीचा टॅक्सी संघटनाचा इशारा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा