Advertisement

रेल्वे प्रवासात मास्कचा वापर कमी

सध्यस्थितीत ही लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी देखील धावत आहे.

रेल्वे प्रवासात मास्कचा वापर कमी
SHARES

मुंबईसह राज्यभरात मागील वर्षी कोरोनानं हात पाय पसरत सर्व सुविधा बंद केल्या होत्या. कोरोनामुळं मुंबईची लाइफलाइन लोकल सेवाही बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. सध्यस्थितीत ही लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी देखील धावत आहे. मात्र, ही धोक्याची घंटा असल्याचं चित्र आता समोर येऊ लागलं आहे. कारण सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू केल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. 

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली असून, अवघ्या १५ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं या रुग्णवाढीचा थेट संबंध लोकल प्रवासाशी जोडला जात आहे. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळं अंतर नियमांचा फज्जा उडत असताना अनेक प्रवासी मास्क लावण्याच्या नियमाकडंही दुर्लक्ष करत आहेत.

मागील १५ दिवसांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १४ हजार ५००हून अधिक रेल्वे प्रवाशांवर विनामास्क प्रवास करत असल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही मुंबईकर याबाबत बेपर्वा आहेत. सर्वसामान्य प्रवाशांसाठी १ फेब्रुवारीपासून लोकलचे दरवाजे मर्यादित वेळेसाठी उघडण्यात आले. सर्वानाच सकाळी ७च्या आधी आणि दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ७ नंतर लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली.

हा पर्यायही अनेकांनी निवडला असून, कार्यालयीन वेळाही त्याप्रमाणे बदलून घेतल्या. त्यामुळं प्रवासी संख्याही काहीशी वाढली आहे. परंतु ही संख्या वाढत असतानाच करोना प्रतिबंध नियमावलीकडे प्रवाशांनी दुर्लक्षच केलं आहे. अनेक प्रवाशी प्रवासादरम्यान मास्कचा वापर करीत नसल्याचं आढळलं आहे. काही जण हनुवटीवर मास्क ठेवून सहकारी प्रवाशांसोबत गप्पांच्या फडात सहभागी होताना दिसतात. 

केवळ प्रवासादरम्यानच नव्हे तर स्थानकात उतरल्यानंतरही ही मंडळी मास्कचा वापर करीत नाहीत. कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. यामुळे मास्कचा वापर करून खबरदारी घेणाऱ्या प्रवाशांचे मास्कविना प्रवास करणाऱ्यांशी वाद होत आहेत. विनामास्क प्रवास करणाऱ्यांबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनीही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून, पादचारी पूल, फलाट, स्थानकांची प्रवेशद्वारे येथे पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत एकूण चार हजार ६१८ मास्कविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक २ हजार ५५८ प्रवाशांचा, तर मध्य रेल्वेवरील २,०६० प्रवाशांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी पश्चिम रेल्वेवर कारवाई करण्यात आलेले ५७१ प्रवासी पहिल्याच दिवशी सापडले होते. दोन्ही मार्गावरील मास्कविना प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून साडेचार लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

प्रवासी संख्येत वाढ

१ फेब्रुवारीपासून सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास खुला झाला. पश्चिम रेल्वेवर सध्याच्या घडीला दररोज १७ लाख ५९ हजार १२३ प्रवासी प्रवास करीत असून मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या २१ लाखांवर पोहोचली आहे. टाळेबंदीआधी या दोन्ही मार्गावरून दररोज ८० लाखांहून अधिक  प्रवासी दररोज प्रवास करीत होते.



हेही वाचा -

नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

IRCTC कडून नवीन पेमेंट गेटवे लाँच


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा