Advertisement

मुंबई उपनगरीय लोकलला ‘एशियन बँके’कडून ५० कोटी डाॅलरची मदत


मुंबई उपनगरीय लोकलला ‘एशियन बँके’कडून ५० कोटी डाॅलरची मदत
SHARES

‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके’ (एआयआयबी) कडून मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विस्तारासाठी ५० कोटी डॉलरच्या (सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये) कर्जाऊ वित्त सहाय्याला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून उपनगरीय रेल्वे मार्गांचं विस्तारीकरण तसंच अपघातप्रवण भागासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील.

‘एआयआयबी’ची वार्षिक सर्वसाधारण गेल्या वर्षी पहिल्यांदाच मुंबईत झाली होती. भारतात सभा घेण्याची बँकेची ही पहिलीच वेळ होती. या बैठकीत केंद्र सरकारच्या वतीने मुंबईतील उपनगरीय रेल्वे तसंच मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीत बँकेच्या संचालक मंडळाने या प्रस्तावावर विचारविनीमय करून मुंबई उपनगरीय रेल्वेला निधी देण्याचा निर्णय घेतला. 'एआयआयबी'चे उपाध्यक्ष व मुख्य गुंतवणूक अधिकारी डी. जे. पांडियन आणि महासंचालक लॉरेल ऑस्टफिल्ड यांनी शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा मुंबईत केली. 

'राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर 'एआयआयबी'ने मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा आणि या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा अभ्यास केला. मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी असून त्यात रेल्वेचं ४०० किमी लांबीचं जाळं आहे. दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी या रेल्वेसेवेचा लाभ घेतात. त्यांच्या अडचणी, गरजा, मुलभूत सोई यांचा अभ्यास करून बँकेने या सेवेसाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं पांडियन म्हणाले.

मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर सर्वाधिक अपघात होणारी ३६ ठिकाणं आहेत. रेल्वे मार्गालगत कुंपण घालून किंवा काँक्रीटची भिंत उभारुन, पादचारी पूल किंवा भूमिगत मार्ग उभारून या ठिकाणी होणारे अपघात कमी करणे, याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विरार-डहाणू रोड ६४ किमी चौपदरीकरण आणि कर्जत-पनवेल २८ किमी नवा लोकल कॉरिडोर उभारण्याचं कामही हाती घेण्यात येईल.

शिवाय 'एआयआयबी'ने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा गुंतवणूक निधीमार्फत (एनआयआयएफ) भारतात २९० कोटी डॉलरच्या (सुमारे २१ हजार कोटी रुपये) गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवणे, वीजवहन सक्षम करणे, जलमार्ग वाहतुकीचे पर्याय उभे करणे, इ. समावेश आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा