Advertisement

बेस्टच्या ताफा वाढणार; २००० ई-बस होणार दाखल


बेस्टच्या ताफा वाढणार; २००० ई-बस होणार दाखल
SHARES

पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी बेस्ट प्रशासन विजेवर धावणाऱ्या अधिकाधिक बसगाड्या  आपल्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबईत टप्प्याटप्प्याने विजेवर धावणाऱ्या आणखी २००० बसगाड्या दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्राकडून विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांची योजना राबविली जात आहे. विजेवर धावणाऱ्या बससाठी कमी खर्च येतो, तसेच प्रदूषणही होत नसल्यानं या बसगाड्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतला. सद्यस्थितीत स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील डिझेल, सीएनजीवर धावणाऱ्या बसबरोबरच २८८ विजेवरील बसही बेस्टच्या ताफ्यात आहेत.

१ ते २ महिन्यांत १०० विद्युतवरील बस येतील. या एकमजली बस असतील. त्यानंतर डिसेंबर २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्यांत आणखी १ हजार ९०० विद्युत बस दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचं समजतं. यामध्ये एसी आणि विनावातानुकूलित मोठ्या एकमजली तसेच मिडी बसचा समावेश असेल.

सध्या बेस्ट उपक्रमाकडून महिलांसाठी तेजस्विनी बसगाड्या चालवण्यात येतात. शिवाय महिला प्रवाशांसाठी विशेष बस फेऱ्याही होतात. यापुढे येणाऱ्या विद्युत बसची संख्या पाहता महिला विशेष बसगाड्यांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे समजतं.

बेस्टच्या ताफ्यात सध्या ३ हजार २९६ बस असून यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश आहे. डिझेलवरील २९५ स्वमालकीच्या आणि ५५५ भाडेतत्त्वावरील, सीएनजीवरील १ हजार ६९० स्वमालकीच्या बस आणि ५०० भाडेतत्त्वावरील, तर विजेवरील भाडेतत्त्वाच्या २८२ बस आणि स्वमालकीच्या ६ बस आहेत. 

डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमतींमुळे खर्च कमी करण्यासाठी डिझेलवरील स्वमालकीच्या बसही सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येत असल्याचे समजतं.

बेस्टकडून विद्युतवर धावणाऱ्या बसगाडय़ा दाखल करताना यात एकमजली बसबरोबरच दुमजली बसचाही समावेश करण्यात आला आहे. त्यांची संख्याही १०० पेक्षा अधिक आहे. याशिवाय साध्या ४०० बस येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतही टप्प्याटप्प्यात दाखल होतील. बेस्टच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या ४८ दुमजली बस, एकमजली १,४७७ बस आणि मिडी ४६० आणि विद्युतवर धावणाऱ्या सहा बस आहेत. उर्वरित बस या भाडेतत्त्वावरील आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा