Advertisement

बेस्टची मिनी बस 'अशी' ठरू शकते फायदेशीर


बेस्टची मिनी बस 'अशी' ठरू शकते फायदेशीर
SHARES

लोकलनंतर बेस्ट बस ही मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन. गेली अनेक वर्ष बेस्ट मुंबईकरांना कमी तिकीट दरात आपली सुविधा पुरवत आहे. सुरूवातीला बेस्ट ही प्रवाशांची अविभाज्य घटक होती. मात्र, कालांतरानं मुंबईत आलेल्या ओला-उबेर या अॅप आधारीत टॅक्सी सेवेमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली. सध्या मुंबईच्या कानाकोपऱ्यात ओला-उबेर या टॅक्सी धावत असल्यानं प्रवाशांनी बेस्टकडं पाठ फिरवली आहे. याचा परिणाम बेस्टच्या उत्पनावर होत आहे. उत्पनावर परिणाम झाल्यानं बेस्टला आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देणं कठीण झालं आहे. त्यामुळं बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट प्रशासनानं अनेक उपाय-योजना केल्या. त्यानुसार, बेस्टनं तिकीट भाड्यात कपात करत किमान तिकीट ५ रुपये केलं. तसंच, प्रवाशांच्या दृष्टीनं बेस्टचा ताफा वाढवण्यासाठी अनेक बस भाडेतत्वावर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.  

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत झालेली घट भरून काढण्यासाठी बेस्टनं तिकीट दरात कपात केली. त्यानुसार, साध्या बसचं किमान तिकीट भाडं ५ रुपये आणि एसी बसचं किमान भाडं ६ रुपये केलं. तिकीट दरात कपात केल्यामुळं प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली. मात्र, अद्यापही बेस्टला मुंबईतील काही बेस्ट मार्गावर आर्थिक तोटा सहन कारावं लागत आहे. याचं कारण म्हणजे 'या मार्गांवर असलेल्या बसच्या सेवेची कमतरता आणि प्रवाशांची रिक्षा-टॅक्सीला असलेली मागणी.

मुंबईतील महत्वाच्या मार्गांवर आणि गल्लोगल्ली बेस्टची बस धावत आहे. परंतु, या मार्गावर धावणाऱ्या अंदाजीत १० बसपैकी २ ते ३ बस पूर्ण भरून धावतात. उर्वरित बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असते. परिणामी इंधनाच्या खर्चात वाढ होते. तसंच, इंधनाच्या खर्चात वाढ झाल्यानं या मार्गावर बेस्टला मोठ्या प्रामाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसची सेवा पुरवत आहे. मात्र, या परिसरात जागेची कमतरता असल्यानं प्रवासी तिथं उपलब्ध असलेल्या रिक्षा-टॅक्सीनं प्रवास करतात. उदा. दादर पश्चिम स्थानकाबाहेरून वरळीला जाण्यासाठी बेस्टनं 'दादर स्थानक ते वरळी गाव' अशी बस सेवा सुरू केली आहे. मात्र, या परिसरात जागेची कमतरता असल्यानं प्रवासी टॅक्सीसाठी रांग लावतात. तसंच, हा परिसर वर्दळीचा असल्यानं मोठ्या प्रमणात वाहतुककोंडी निर्माण होते. त्यामुळं आरामदायी आणि जलद प्रवासासाठी प्रवासी टॅक्सीनं प्रवास करतात.

मात्र, या मार्गावर बेस्टच्या ताफ्यात नव्यानं दाखल होणाऱ्या मिनी आणि मिडी एसी बस चालवल्यास बेस्टच्या उत्पनात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे, इंधन खर्चही कमी होऊ शकतो. नुकतंच बेस्टच्या ताफ्यात ६ मिनी एसी बस दाखल झाल्या आहेत. मात्र, अद्याप या बसचा मार्ग निश्चित न करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. त्यामुळं या बस नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार तसंच, या बसच्या माध्यमातून बेस्टला किती फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी या मिनी बस चालविल्या तर प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल. बेस्टच्या या बस प्रवासी क्षमतेनुसार पूर्णपणे भरून धावतील. त्यामुळं त्या मार्गावर होणारा आर्थिक तोटा घटेल. 

बेस्ट प्रशासनानं भाडेतत्त्वावर आणखी १ हजार बसेस घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये ५०० मिनी वातानुकूलित सीएनजी आणि ५०० मिनी वातानुकूलित डिझेल या प्रकारातल्या १ हजार गाड्यांचा समावेश असून त्यांची किंमत २ हजार ६२२ कोटी रुपये इतकी आहे. या मिनी बसेस एसी असून डिझेलवर धावणाऱ्या आहेत.. या बसेसचा उपयोग मुंबईच्या ट्रॅफिकमधून मार्ग काढण्यासाठी होणार आहे.

याआधी बेस्टनं ४०० एसी मिनी बसेस आणि ८० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या फेम-योजनेंतर्गत आणखी ३०० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आणखी १ हजार गाड्याही ताफ्यात समाविष्ट करून घेण्यात येणार आहेत. त्यामुळं बेस्टच्या ताफ्यात आता भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या १८०० पर्यंत जाणार आहे.



हेही वाचा -

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ८,५०० रुपयांची गुंतवणूक

अभिनंदन, इन्स्पेक्टर विजय! मुंबई पोलिसांकडून ‘बिग बीं’ना शुभेच्छा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा