बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना आता घरबसल्या बसचे तिकीट काढता येणार आहे. शिवाय, यामुळं प्रवासादरम्यानची गर्दी आणि सुट्या पैशांवरून वाहकासोबत होणारे वाद टळणार आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत नवीन मोबाइल अॅप रुजू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळते.
प्रवाशांना घरबसल्याही तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतला आहे. बेस्ट बसमधून सध्याच्या घडीला २५ लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. कोरोनाकाळाआधी हीच संख्या साधारण ३२ ते ३५ लाख होती. या प्रवाशांना बेस्ट बस आगार किंवा स्थानकात पास उपलब्ध केले जातात, तर दररोजचे तिकीट प्रवासात बेस्ट वाहकांकडून मिळते. परंतु, अद्याप मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यात आली नव्हती.
गर्दीत तिकीट देताना वाहकाचीही तारांबळ उडत होती. तसेच सुट्टय़ा पैशांवरून प्रवाशांसोबत वादही होत होते. एकं दरीत तिकीट प्रक्रि या सोप्पी करण्यासाठी आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर दैनदिन रोख व्यवहार टाळण्यासाठी उपक्र माने प्रवाशांसाठी नवीन मोबाइल तिकीट अॅप तिकीट सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. दैनंदिन तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशाला मोबाइल अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि त्याद्वारे घरबसल्याही तिकीट काढता येणे शक्य होणार असल्याची माहिती मिळते.
हे तिकीट किती तासांसाठीच वैध राहील त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय अॅपवरून पासही काढता येणार आहे. तिकीट आणि पासचे शुल्क अदा करण्याची सोय अॅपमध्ये असणार आहे. प्रवासाच्या वेळी प्रवाशाला या अॅपवरील तिकीट किंवा पास वाहकाला दाखवावे लागणार आहे. बेस्ट उपक्र माने सप्टेंबर २०१९ मध्ये बेस्ट ‘प्रवास अॅप’चे लोकार्पण केले होते.
यातून बसगाडय़ांची सद्यस्थिती समजण्यास शक्य होत आहे. आगार किंवा थांब्यावर बस किती वेळात येईल, कोणती बस नेमक्या कोणत्या मार्गावर आहे यासह अन्य सुविधाही उपलब्ध केल्या. या प्रवास अॅपमधील सुविधेची लिंकही नवीन मोबाइल तिकीट अॅपशी जोडली जाणार आहे. या लिंकद्वारे प्रवासी अॅपमध्ये जाऊन प्रवाशांना बसगाड्यांची सद्यस्थितीही जाणून घेता येईल आणि त्याद्वारे तिकीट काढता येईल.