Advertisement

आंदोलनाला उलटले 22 दिवस, प्रशासन ढिम्मच!


आंदोलनाला उलटले 22 दिवस, प्रशासन ढिम्मच!
SHARES

बेस्ट उपक्रमातील कॅज्युअल कामगारांचे बेमुदत आंदोलन 3 ऑक्टोबरपासून वडाळा आगारसमोर सुरू आहे. यामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले असून मंगळवारी या आंदोलनाचा 22 वा दिवस होता. परंतु, बेस्ट प्रशासन अजूनही शांतच असल्यामुळे मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सदस्य संतापले आहेत. मंगळवारी 22 वा दिवस असला, तरी हे आंदोलनकर्ते ठिय्या धरून बसलेले आहेत. 'आम्हाला बेस्ट उपक्रमात कायम करा' या मुख्य मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. पण या आंदोलनावर तोडगा काढायला बेस्ट प्रशासन असमर्थ ठरले आहे.


'...नाहीतर आंदोलन तीव्र करू'

हे कॅज्युअल कामगार गेल्या 10 वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचे कायम स्वरुपी काम करतात. त्यामध्ये प्रत्येक वर्षामध्ये 240 दिवस आणि त्यापेक्षा जास्त दिवस सलग काम करत आहेत. त्यामुळे कॅज्युअल कामगारांना बेस्ट उपक्रमांच्या सेवेमध्ये कायम स्वरुपी सामावून घेण्यात यावे, अशी मागणी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने करत हे आंदोलन छेडले आहे.

प्रत्येक महिना 15 हजार 309 रुपये दराने महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार 24 फेब्रुवारी 2015 पासून काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, आशा सूचना अप्पर कामगार आयुक्त (मुंबई शहर) यांनी केल्या असूनही बेस्ट प्रशासन या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत नाही. त्यामुळे हे कामगार त्रस्त झाले आहेत.



आयुक्त कार्यालयावर कामगारांची उग्र निदर्शने

वरील मागण्यांची पूर्तता बेस्ट प्रशासनाने करावी म्हणून 3 ऑक्टोबर 2017 पासून बेस्ट उपक्रमातील कॅज्युअल कामगारांनी बेमुदत आंदोलनाची मुहूर्तमेढ कसारा आगरासमोर रोवत 5 ऑक्टोबर 2017 रोजी वडाळा आगरासमोर निदर्शने केली.

या आंदोलनाची कल्पना देण्यासाठी 10 ऑक्टोबर 2017 रोजी पाठकवाडी आगर ते मुंबई महानगर पालिका कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त तोडून मोर्चा धडकवला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मुंबईचे महापौर यांना निवेदन देऊन मध्यस्थी करण्याचे साकडे घातले होते. 13 ऑक्टोबर रोजी कामगार आयुक्त कार्यालयावर उग्र निदर्शने देखील करण्यात आली होती. परंतु, अद्याप या आंदोलनावर तोडगा न निघाल्यामुळे दिनांक 25 ऑक्टोबर रोजी वडाळा अगरासमोर सायंकाळी 5.30 वाजता जाहीर सभा घेण्यात येणार आहे.


तोडगा काढला नाही तर 'हे' कामगारही आंदोलन करणार!

या मध्ये मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. या सभेतून देखील योग्य न्याय मिळाला नाही, तर हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा युनियनकडून देण्यात आलाय.

निर्णय घेतले नाहीत, तर बेस्ट उपक्रमाचे वीजपुरवठा कामगार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे वीज कामगार आंदोलनामध्ये सामील होणार आहेत, अशी माहिती युनियनचे मुंबई विभागाचे उप-सरचिटणीस पवन गायकवाड यांनी दिली.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा