बेस्ट मार्गिका गेली कुठे ?

बीकेसी - बेस्टचा मार्ग सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीएनं तब्बल एक कोटी खर्चून बीकेसीत स्वतंत्र बेस्ट मार्गिका बांधली. सहा महिन्यांपूर्वी ही मार्गिका सुरू करण्यात आली. मार्गिका सेवेत दाखल होते न होते तोच आठवड्याभरातच ही मार्गिका बिनकामाची झाल्याचं समोर आलंय. डबल डेकर बसला तर या मार्गिकेवरून जाताच येईना. बस सोडून रिक्षा, टॅक्सी, सायकल या मार्गिकेवरून धावू लागल्यात. त्यानंतर महिन्याभरातच या मार्गिकेचे दोरखंड गायब झाले, खांब उखडले, तुटले नि जनतेचे एक कोटी पाण्यात गेले.

आता तर या मार्गिकेचा सुपडासाफ झाला आहे. एक कोटी खर्च करून बांधण्यात आलेली मार्गिका गायब झाली आहे. बिनकामाची ठरलेल्या मार्गिकेची आता नव्याने बांधणी करण्याचा घाट एमएमआरडीएने घातला आहे. एक कोटी पाण्यात घातल्यानंतर आता पुन्हा आणखी पैसा उधळण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठीच हे होत असल्याचा आरोप होत आहे.

पायाभूत सुविधांच्या नावावर कोटीचे प्रकल्प आणायचे आणि स्वत:चे आणि कंत्राटदारांचे खिसे भरायचे असा कारभार राजरोसपणे एमएमआरडीएत सुरू आहे. सायकल ट्रॅक आणि ही मार्गिका ही याची उत्तम उदाहरण. आता एमएमआरडीएच्या या मनमानी कारभाराला कोण आणि कसा लगाम लावणार हाच प्रश्न आहे.

Loading Comments