Advertisement

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार खात्यात जमा


अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार खात्यात जमा
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ‘बेस्ट’ प्रशासनाच्या ४४ हजार कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेला त्यांच्या खात्यावर जमा झाला झाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मागील ५ महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्याने ‘बेस्ट’ कर्मचारी त्रस्त झाले होते. त्यामुळे हे कर्मचारी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर संपाच्या १६ तासांतच कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले.


यशस्वी मध्यस्थी

आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ प्रशासनाला मार्च महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार देणेही कठीण झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार महिनाअखेरपर्यंत लांबत होता. या प्रकाराने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत होती.

या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’ महापालिकेचाच उपक्रम असल्याने ‘बेस्ट’ला महापालिकेने आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी ‘बेस्ट’च्या ९ संघटनांनी कृती समिती स्थापन करून निर्णायक लढा सुरू केला होता.

उपोषण करूनही दाद न मिळाल्याने अखेर महापालिका प्रशासनाविरोधात ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हा संप झाल्यामुळे बेस्टच्या ३५ लाख प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृती समिती आणि प्रशासन यांच्यात मध्यस्थी करून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार १० तारीखेपर्यंत देऊ, असा शब्द दिला होता. त्यानुसार १० तारखेला पगार खात्यावर जमा झाल्यामुळे कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.


असा होतो कर्मचाऱ्यांचा पगार

‘बेस्ट’च्या ४४ हजार कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार देण्यासाठी १८० कोटी रुपये लागतात. यातील ८० कोटी रुपये थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होतात. तर उर्वरीत १०० कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा पीएफ, विमा हफ्ते, कर्जात विभागले जतात.


आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न

‘बेस्ट’ चालवायची असेल तर उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारलीच पाहिजे, अशी भूमिका
महापालिका आयुक्तांची असल्याने ते बेस्ट प्रशासन, बेस्ट समिती अध्यक्ष, संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ‘शब्दा’नुसार कर्मचाऱ्यांचा पगार वेळेतच त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. यापुढेही कर्मचाऱ्यांचे पगार १० तारखेपर्यंत होतील. ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाय करण्याबाबत संयुक्त बैठका सुरू आहेत.
- अनिल कोकीळ, अध्यक्ष, बेस्ट समिती



हे देखील वाचा -

बेस्टप्रमाणे महापालिकेलाही शिवसेना खड्ड्यात घालणार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा