Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांचा 21 आणि 22 मार्चला होणार पगार


बेस्ट कर्मचाऱ्यांचा 21 आणि 22 मार्चला होणार पगार
SHARES

मुंबई - तोट्यातील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत आता मुंबई महापालिकेने मध्यस्थी केली असून बेस्टला नफ्यात आणण्यासाठी महापालिकेचा कृती आराखडा बनवला जाणार आहे. मात्र, तूर्तास बेस्ट निधीतूनच कामगारांना पगार दिले जाणार आहे. चतुर्थ श्रेणी कामगारांना 21 मार्च आणि 22 मार्चला पगार होणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

बेस्ट उपक्रमातील सुमारे 44 हजार कामगार कर्मचारी वर्गाचा पगार अद्यापही झालेला नाही. बेस्टच्या कामगारांचा पगार हा प्रत्येक महिन्यात 10 तारखेपर्यंत होणे अपेक्षित असते. परंतु हा पगार अद्यापही न झाल्यामुळे कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बेस्ट कामगारांचा पगार न झाल्यामुळे महापालिका सभागृहात तीव्र पडसाद उमटले होते.

या वेळी थकीत पगाराच्या बाबतीत आपण विशेष बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर आदी उपस्थित होते.

मात्र, या बैठकीला उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्यासह कोणत्याही पक्षांचे गटनेते उपस्थित नव्हते. शिवसेनेने इतर पक्षांना विचारात न घेता हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. बैठकीत बेस्टला कायमस्वरूपी नफ्यात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर यांनी दिली. हा आराखडा येत्या सात ते आठ दिवसांमध्ये पूर्ण केला जाईल आणि त्याप्रमाणे बेस्टला आर्थिक मदत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे 21 मार्च रोजी 21 हजार कामगार आणि 22 मार्चला 22 ते 23 हजार कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला पगार दिला जाईल असे महापौर महाडेश्वर यांनी स्पष्ट केले. बेस्ट कामगार आणि कर्मचाऱ्यांचा वेतनापोटी सुमारे 182 कोटी रुपये खर्च येतो. त्यामुळे वेतनापोटीची रक्कम बेस्टला दिली जाईल, पण ती रक्कम कोणत्या खात्यातून वर्ग केली जाईल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. कृती आराखड्यानंतरच चित्र अधिक स्पष्ट केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा