Advertisement

उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर बेस्टचा संप मागे


उद्धव ठाकरेंच्या आश्वासनानंतर बेस्टचा संप मागे
SHARES

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईकरांचे 16 तास हाल केल्यानंतर अखेर बेस्टने आपला संप मागे घेतला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्यात मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला. यावेळी मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल उद्धव ठाकरेंनी दिलगिरीही व्यक्त केली. सोबतच बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 ऑगस्टपर्यंत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 

रविवारी रात्री एकूण 36 हजार कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे बेस्टचे 500 मार्ग बंद झाल्याने प्रवाशांनी टॅक्सी रिक्षाचा आधार घेतला. कुर्ला येथे प्रवाशांची रिक्षा टॅक्सीसाठी भली मोठी रांग लावली होती. याचा फायदा उचलत रिक्षाचालकही वाढीव भाडे आकारत असल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले अशी प्रतिक्रिया मुंबईकर प्रवाशांनी दिली.

रविवारी दुपारी मुख्यमंत्री, महापौर तसेच बेस्ट कृती समितीमध्ये बैठक झाली होती. पण ती फोल ठरली. या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्यामुळे कर्मचारी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम होते. जोपर्यंत महापालिका आयुक्त लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार अशी भूमिका बेस्ट कृती समितीने घेतली होती. गेले काही दिवस बेस्ट कर्मचारी वडाळा येथे उपोषणाला बसले होते. पण गुरुवारी उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर 6 ऑगस्टपर्यंत जर तोडगा काढला नाही तर, संपावर जाणार असा इशार कृती समितीने दिला होता.


यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नये, अशी विनंती केली होती. त्याचसोबत येत्या 10 ऑगस्टला बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येईल, असे तोंडी आश्वासनही त्यांनी दिले. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. असे महाडेश्वर म्हणाले.


बेस्ट संपामुळे मुंबईकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. बेस्टची जबाबदारी यापुढे आम्ही घेत आहोत. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील, याची मी शाश्वती देतो.
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना


कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील हे आयुक्तांनी लेखी लिहून द्यावे, अशी आमची प्रमुख मागणी होती. तांत्रिक कारणांमुळे त्यांनी तसे लिहून न दिल्याने आम्ही संप पुकारला. पण उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार या महिन्याच्या १० तारखेला होतील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही संप मागे घेत आहोत. त्यानुसार सर्व कर्मचारी कामावर रुजू होतील.
शंशाक राव, अध्यक्ष, बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती

 


हेही वाचा -

रक्षाबंधनला प्रवाशांचे हाल? बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत

गोरेगावमध्ये धावणार बेस्टची मिडी बस!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा