रक्षाबंधनला प्रवाशांचे हाल? बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत

  wadala
  रक्षाबंधनला प्रवाशांचे हाल? बेस्ट कर्मचारी संपाच्या तयारीत
  मुंबई  -  

  रक्षाबंधनच्या दिवशी संपावर जाण्याचा निर्णय बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने घेतला आहे. एकीकडे रक्षाबंधनच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाने मुंबई शहर आणि उपनगरात प्रवाशांच्या सोयीकरीता ज्यादा बस सोडण्याचे जाहीर केले.

  तर, दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी रविवार ६ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी रक्षाबंधनला संपावर जाण्याचे ठरवले आहे. यामुळे रक्षाबंधनला बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप केल्यास ३० लाख प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.


  आर्थिक तोटा, वेतनावर तोडगा हवा

  आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने मुंबई महापालिकेला साद घातली. यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली तीन बैठकाही झाला. पण त्यातून कुठलाही निष्कर्ष निघू शकला नाही.

  बैठकीत तोडगा न निघाल्याने बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य करण्यासोबत इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून बेस्ट समितीचे नाराज पदाधिकारी तसेच कार्यकर्ते वडाळा येथे उपोषणाला बसले होते. पण महापालिकेने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ७ ऑगस्टपासून संप करण्याचे समितीने ठरवले आहे.

  बेस्टची आर्थिक स्थिती सध्या खूपच बिकट असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर मासिक वेतन देखील मिळत नाही. बेस्ट आपल्या कर्मचाऱ्यांची उपेक्षा करत असल्यानेच नाईलाजाने संपाचे हत्यार उपसावे लागत असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे म्हणणे आहे.


  ९७ % कर्मचारी संपाच्या बाजूने

  कामगार संघटनांनी गुरूवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांची भेट घेतली. कृती समितीने घेतलेल्या मतदानात ९७ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


  २१२ जादा बसगाड्या

  मुंबई शहर आणि उपनगरातून रक्षांबधनाच्या दिवशी ७ ऑगस्ट रोजी ज्यादा बस सोडण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. शहर आणि उपनगरातील विविध बसमार्गावरुन एकूण २१२ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

  या बसगाड्याचे प्रवर्तन १२.३० पासून दिवसभर पुढे चालू राहील. तसेच प्रवाशांची गर्दी लक्षात घेउन जादा बस सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.


  संपाबाबत महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  बेस्ट कामगारांनी सोमवारपासून संपाचा इशारा दिल्यानंतर बेस्ट कामगारांवर संप करण्याची वेळ येऊ देणार नाही, असे सांगत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी भेट देण्याची मागणी केल्याचे सांगितले. बेस्ट उपक्रमाची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांसमवेत आपली भेट घेवू इच्छितो, अशा प्रकारचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. मुख्यमंत्री, आता महापौरांना वेळ देतात का याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.


  हे देखील वाचा -

  पेंग्विन कक्षाच्या इमारतीत उभारणार बेस्टचे संग्रहालय

   

  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.