बेस्टला पुन्हा महापालिकेकडून गाजर, मदतीबाबत 10 ऑगस्टला पुढील निर्णय

 BMC
बेस्टला पुन्हा महापालिकेकडून गाजर, मदतीबाबत 10 ऑगस्टला पुढील निर्णय
BMC, Mumbai  -  

तोट्यात असलेल्या बेस्टला आर्थिक मदत करण्यासाठी महापालिकेकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 31 जुलैला होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन बेस्टला मदत करण्यात येईल, असे राणा भीमदेवी थाटात जाहीर केले होते. पण सोमवारी पार पडलेल्या बैठकीत कोणताही निर्णय न घेता पुन्हा एकदा निर्णय पुढे ढकलत पुढील 10 ऑगस्टला यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी जाहीर केले.


तोट्यात चाललेल्या बेस्टला महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत करण्याच्या मागणीबाबत पुन्हा एकदा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सर्व गटनेते, कामगार संघटना, बेस्ट आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक पार पडली. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी काही प्रभावी उपाययोजनांचा आराखडा या बैठकीत सादर केला आहे. या आराखड्यावर बेस्ट समिती आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. बेस्ट समिती आणि कामगार संघटनांचे एकमत झाल्यानंतर आपण आयुक्तांसोबत बसून पुढील निर्णय घेऊ. यासाठी 10 ऑगस्ट रोजी पुढील बैठक घेण्यात येईल. तत्पूर्वी जर त्यांनी आपले एकमत झाल्याचे कळल्यास लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.


'कृती समितीच्या वतीने करणार साखळी आंदोलन'

बेस्ट हा महापालिकेचा भाग आहे. बेस्टचा कारभारी हा महापालिकेचा आहे. पण सोमवारी झालेली तिसरी बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे मंगळवारपासून वडाळा डेपोत कृती समितीच्या वतीने साखळी आंदोलन केले जाईल, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी सांगितले. बैठकीत सादर केलेल्या आराखड्यात 1 हजार 250 बसेस भाडेतत्वावर घेण्याची सूचना करण्यात आली. पण या आरखड्यात कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न दिसत नाही. भत्ते आणि व्हिआर, सीआरएस देण्याचेच म्हटले आहे. त्याला आपला पाठिंबा मिळणार नाही, असेही संकेत त्यांनी दिले. मागील बैठकीत आयुक्तांनी जे मुद्दे मांडले, तेच या बैठकीत प्रस्तावाद्वारे त्यांनी पुढे आणले, असे राव यांनी सांगितले.


'बेस्टचे अस्तित्वच संपुष्टात येईल'

कामगार संघटनांसोबत ही तिसरी बैठक आहे. पण हीसुद्धा बैठक कोणत्याही निर्णयाविना गुंडाळली गेली. महापालिकेला बेस्टला आर्थिक मदत करायची नाही, असा आरोपच विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. त्यामुळे येत्या काही दिवसांत बेस्टचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष बेस्टबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे जर बेस्टचे कर्मचारी उपोषणाला बसले, तर त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशाराही राजा यांनी दिला.


अन्य गटनेत्यांना डावलले

महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सापाचे गटनेते रईस शेख यांना देण्यात आले नव्हते. तर, भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनाही कल्पना देण्यात आली नसल्याची तक्रार त्यांनी केली. या बैठकीला विरोधी पक्षनेते रावीराजा आणि बेस्ट समितीचे सदस्य हजर होते. त्यामुळे या बैठकीबाबत एकप्रकारे नाराजी व्यक्त केली जात आहे.हेही वाचा

बेस्टला वाचवण्यासाठी टीसीच वाटतायत पत्रकं!

गोरेगावमध्ये धावणार बेस्टची मिडी बस!


Loading Comments