Advertisement

'बेस्ट उपक्रम तोट्यात घालायला बेस्ट व्यवस्थापन कारणीभूत'


'बेस्ट उपक्रम तोट्यात घालायला बेस्ट व्यवस्थापन कारणीभूत'
SHARES

बेस्ट प्रशासनाचा उपक्रम तोट्यात नाही तर हा उपक्रम चालविणारे व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीचे नियोजन करीत असल्याने बेस्टला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे आणि या सर्व चुकीच्या नियोजन पद्धतीमुळे बेस्ट कामगारांचे पगार थकत आहेत. हे त्वरित थांबले पाहिजे, यासाठी रयतराज कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी वडाळा आगार येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

कैझन घोटाळा हा बेस्ट प्रशासनाच्या व्यवस्थापनातून जाणीवपूर्वक केलेला घोटाळा आहे. तर कॅनेडीयन वेळापत्रक म्हणजे बेस्ट कामगारांची एक प्रकारे छळवणूक करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले वेळापत्रक आहे. त्यामुळे ट्रापीज कंपनीसोबत कॅनडियन वेळापत्रकाबाबत झालेला करार असल्याने त्यास पुन्हा मुदतवाढ देऊ नये. तर हे वेळापत्रक वेळोवेळी वेगवेगळ्या आगारांमध्ये प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत असल्याने बदलापूर, कल्याण, पनवेल आदी ठिकाणी राहणाऱ्या कर्मचऱ्यांना या वेळापत्रकामुळे अनेकदा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे हे सर्व थांबले पाहिजे. अशी मागणी रयतराज कामगार संघटनेचे प्रतिनिधी नवनाथ चव्हाण यांनी सदरील निदर्शनात केली असून, कामगारांचे भत्ते बंद होऊ देणार नाही. त्यांना 1 ते 10 तारखेदरम्यान पगार देण्यात यावा. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितले. तर वीज चोरी प्रकरण, पवन उर्जा घोटाळा, गोराई बिच येथील कमीशन घोटाळा, केएलजी, विजमीटर, जाहिरात कंत्राट इत्यादी घोटाळे झाले आहेत. यावर वेळीच निर्बंध आणला असता तर आज आर्थिक नुकसान झाले नसते. हे सर्व नुकसान बेस्ट प्रशासनाच्या चुकीच्या व्यस्थापनामुळे होत आहे. हे हाणून पाडण्याचे काम कर्मचारी वर्गाने एकत्र येऊन करायला हवे असा हल्लाबोल देखील यावेळी करण्यात आला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा