मुंबईत धावणार विना कंडक्टर मिनी एसी बसेस

  Mumbai
  मुंबईत धावणार विना कंडक्टर मिनी एसी बसेस
  मुंबई  -  

  मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक टंचाईनंतर वातानुकूलित बसेस बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दिल्लीजवळील नोएडाच्या धर्तीवर मुंबईत 20 ते 22 आसनी छोट्या वातानुकूलित बसेस सुरू करण्याच्या विचारात बेस्ट उपक्रम आहे. विशेष म्हणजे या बसेसमध्ये कंडक्टर नसणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि दाटीवाटीने असलेल्या छोटया रस्त्यावरही सहज चालवता येतील, अशा स्वरुपाच्या या छोट्या बसेसचा फायदा बेस्टला होणार असून, यासाठी वाहकालाही गरज भासणार नसल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  बेस्ट उपक्रम तोट्यात असताना काही मार्ग बंद करून तर काहींच्या मार्गात बदल करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून पांढरा हत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वातानुकूलित बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहकाविना चालवता येतील अशा 20 ते 22 आसनी छोट्या वातानुकूलित बसेस मुंबईच्या रस्त्यावर बेस्टच्यावतीने आणण्याचा विचार प्रशासनाचा आहे. नोएडामध्ये सध्या अशा छोट्या वातानुकूलित बसेस चांगल्याप्रकारे चालवल्या जात आहेत. या बसेससाठी वाहकांची आवश्यकता लागत नाही. प्रारंभी अशा प्रकारच्या सुमारे 50 बसेस खरेदी करण्याचा विचार असल्याचं बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

  बेस्ट बसेस खरेदीसाठी महापालिकेकडे 64 कोटींची मागणी -

  सध्या बेस्टच्या वतीने 100 बसेस खरेदी करण्यात येत असून, त्यातील काही बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या सर्वांसाठी 64 कोटी रुपयांचा खर्च आला असून, या खर्चाची रक्कम महापालिकेच्या वतीने दिली केली जाणार आहे. मागील वर्षी 300 बसेस खरेदी करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने आपल्या अर्थसंकल्पात केली होती. परंतु आता या बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने या बसेस खरेदीची रक्कम देण्यासाठी 64 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेला पाठवला आहे. स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.