SHARE

सतत तोट्यात असल्याचे कारण पुढे करत बेस्ट प्रशासनाने 266 वातानुकूलित बसेस बंद केल्या आहेत. त्यानंतर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी बेस्टने 303 नव्या कोऱ्या बसेस खरेदी करण्याचे ठरवले होते. मात्र पुन्हा आर्थिक अडचण असल्याचे सांगत बेस्टने या 303 बसपैकी 185 बसेसची खरेदी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता फक्त 112 नव्या कोऱ्या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. बेस्टच्या या आर्थिक अडचणीमुळे मुंबईकर बेस्ट प्रवाशांचे नव्या कोऱ्या बसचे स्वप्न पुन्हा भंगणार आहे.

बेस्टच्या ताफ्यातील 400 जुन्या बसेस नादुरुस्त झाल्यामुळे काढून टाकाव्या लागल्या होत्या. त्यामुळे बेस्टच्या बसचा तुटवडा निर्माण झाला होता. बेस्टकडे नवीन बस खरेदीसाठी निधी नसल्यामुळे महापालिकेने गेल्या अर्थसंकल्पात 100 कोटींचे अनुदान दिले होते. त्या अनुदानातून बेस्टने अत्याधुनिक अशा 303 बसेस टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीकडून तयार करून त्यांचे खरेदी करण्याचे योजिले होते. त्यातील 72 बसेस एप्रिल महिन्यात बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. काही बसेस बॅकबे आणि कुलाबा आगारातून धावू देखील लागल्या आहेत. या अत्याधुनिक अशा बसेस प्रवाशांच्या पसंतीला उतरत असताना बेस्टने बस खरेदीसाठी आर्थिक अडचण येत असल्याचे कारण सांगत बेस्ट प्रशासनाने 185 बसेसची खरेदी रद्द केली आहे. बेस्टने यासंदर्भात टाटा मोटर्स कंपनीला पत्र लिहिले आहे.

बेस्ट खरेदीसाठी आर्थिक अडचण असून टाटा मोटर्सने या बसेस देखील उशिरा दिल्या आहेत. त्यामुळे त्या बसेस रद्द कराव्या लागल्या 

- हनुमंत गोफणे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट 

त्यामुळे आता बेस्टच्या ताफ्यात अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त फक्त 112 बसेसच दाखल होणार आहेत. महापालिकेने बस खरेदीसाठी 100 कोटी अनुदान दिले असले, तरी त्यातील 90 कोटी रुपयांची अत्याधुनिक बस खरेदीसाठी तरतूद होती. उर्वरित 10 करोड हे इलेक्ट्रिकल बससाठी ठेवण्यात आले आहेत. अत्याधुनिक 303 बसेसची किंमत 154 कोटींच्या घरात जात होती. त्यामुळे वरील 64 कोटी रुपये देण्यास महापालिकेने बेस्टला नकार दिला. बेस्ट समितीच्या बैठकीत वातानुकूलित बस सुरू करण्याबाबत आणि नवीन मिनी बसेस खरेदी करण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा गारेगार प्रवास लांबणीवर पडणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या