Advertisement

बेस्टला तोट्यातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी सल्लागार नेमणार

मागील अनेक वर्षांपासून बेस्ट मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत आहे. या तोट्यामुळं बेस्टला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

बेस्टला तोट्यातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी सल्लागार नेमणार
SHARES

मागील अनेक वर्षांपासून बेस्ट मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत आहे. या तोट्यामुळं बेस्टला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देणं कठीण जात आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमाला कोट्यवधी रुपयांच्या तोट्यामधून कायमस्वरूपी बाहेर काढून बेस्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि मुंबई महापालिकेशी समन्वय साधून बेस्टला स्वयंपूर्ण करण्यासाठी एक तज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे.

यासंदर्भांत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत पालिका आयुक्त इकबाल चहल, बेस्टचे महाव्यवस्थापक बागडे आणि बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या समवेत महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मुंबईतील समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत सखोल चर्चा झाली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली आहे. शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळावी व पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आता विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्याचअनुषंगाने आदित्य ठाकरे यांनी आज पालिका मुख्यालयात भेट देऊन पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त, उपयुक्त आदींसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली.

यामध्ये, मुंबईतील विविध समस्या, प्रस्तावित कामे, बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणे, मुंबईला पुरमुक्त करणे आणि त्यासाठीची पावसाळी कामे आदींचा सांगोपांग आढावा घेण्यात आला. 'मुंबईत परराज्यातून दररोज मोठ्या प्रमाणात खासगी बसगाड्या येतात. यामधून दररोज हजारो प्रवासी, पर्यटक हे मुंबईतील विविध ठिकाणी जातात. मात्र या बसगाड्या शहरात आल्याने त्या कुठेही कशाही पार्क करण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या बसमध्येच महिला वृध्द, लहान मुले असतात. त्यांच्या सोबत बॅगा, सामान ही असते. त्यामुळे त्यांचे हाल होतात. यावर उपाययोजना म्हणून ‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन योजना’ अंमलात आणायचा विचार आहे',  असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

शिवाय, त्यासाठी या बसगाड्या मुंबईच्या ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतात म्हणजे मुलुंड, वाशी, दहिसर चेकनाका आणि भविष्यातील न्हावा- शेवा याठिकाणी परराज्यातील बसगाड्या थांबविण्यात येतील. तेथून पुढे या प्रवाशांना बेस्टच्या बसगाडयांमधून मुंबईत विविध ठिकाणी जाता येणार आहे. त्यामुळे परराज्यातील नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच, तोटयातील बेस्टलाही उत्पन्न वाढविण्यासाठी एक साधन मिळणार आहे.

बेस्टला तोट्यामधून बाहेर काढण्यासाठी बेस्टने विविध उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे मत यावेळी पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केले. तसेच, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनीही बेस्टच्या समस्या , अडचणी व काही उपाययोजना यांबाबतची माहिती थोडक्यात दिली. यावेळी, बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका अर्थसंकल्पात विलीनीलरण करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा