ऐन होळीत बेस्ट कामगारांवर संक्रांत

 Mumbai
ऐन होळीत बेस्ट कामगारांवर संक्रांत
ऐन होळीत बेस्ट कामगारांवर संक्रांत
See all

मुंबई - मार्च महिन्याची दहा तारीख उजाडली तरी बेस्ट कामगारांच्या खात्यात अजूनही पगाराची रक्कम पडलेली नाही. होळी दोन दिवसांवर आली असून, पगार न झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना आपले बेत रद्द करावे लागले. ऐन सणातच बेस्ट उपक्रमाने पगार न दिल्यामुळे गावातील होळीच्या सणाला कामगार मुकले आहेत. मात्र, निधीच उपलब्ध नसल्यामुळे बेस्ट उपक्रम हतबल झाले आहे.

बेस्ट उपक्रमातील विद्युत तसेच परिवहन विभागातील सुमारे ४० हजार कामगार-कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत होतो. कधीही बेस्ट कामगारांचा पगार अकरा तारखेला होत नाही. मागील काही महिन्यांपासून बेस्टची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. प्रत्येक महिन्याला बँकेतून ओव्हरड्राफ्ट घेऊन पगाराचे नियोजन उपक्रम करत असते. परंतु रविवारी होळी असताना शुक्रवारी दहा तारखेला बेस्ट कामगारांच्या मोबाईलवर बँकेत जमा झालेल्या पगाराचे ‘एसएमएस’ आलेच नाही. त्यामुळे शनिवार,रविवार आणि सामेवारच्या सुट्टीचा योग जुळून आला असला तरी प्रत्यक्षात पगारच न झाल्यामुळे अनेक कामगारांना होळी निमित्त गावी जाण्याचे प्रयोजन रद्द करावे लागले आहे. यामुळे कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गणपतीच्या सणामध्ये बेस्टने कामगारांना सणापूर्वीच पगार दिला होता. गणपतीप्रमाणेच कोकणातील जनतेचा होळी हा सण महत्त्वाचा आहे. परंतु होळीच्या सणामध्ये पगार न देता त्यांना या सणाच्या आनंदावरच विरजण पाडले असल्याचीही नाराजी कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.


बेस्ट प्रशासनाच्यावतीने जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाकडे विविध कंपन्यांची देणी तसेच कामगारांचे पगार द्यावे लागतात. कामगारांच्या पगारापोटीच महिन्याला १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असतो. परंतु निधीच उपलब्ध नसल्यामुळे हा पगार देता आलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पगार देण्याची मुदत बेस्टला वाढवून दिली असली तरी या मुदतीपर्यंतही बेस्टला पगाराची रक्कम कामगारांना देता येणे शक्य नाही. असे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.

Loading Comments