महाराष्ट्र बंदचे पडसाद बुधवारी मुंबईसह राज्यभर उमटले. या बंदमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावर परिणाम झाला. सर्वात जास्त परिणाम मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर झाला. या आंदोलनादरम्यान संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ११० उपनगरीय ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच हळहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे. तिन्ही मार्गावरील सेवा सध्या २० ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहे.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, दादर, गोरेगाव, कांदिवली इ. स्थानकांमध्ये आंदोलन झाल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. तर, हार्बर मार्गावरील गोवंडी आणि जुईनगरमध्ये रेलरोको केल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलकांनी रेल ट्रॅकवर उतरुन आंदोलन केल्यामुळे वाहतूक मोठ्या विस्कळीत झाली. सायंकाळनंतर हळूहळू मध्य आणि हार्बर मार्ग पूर्वपदावर यायला लागली.
बंदचा परिणाम तिन्ही मार्गावर झाला. पश्चिम रेल्वेवरील ६० उपनगरीय ट्रेन्स रद्द करण्यात आल्या तर, २०० पेक्षा जास्त ट्रेन्स त्यांच्या निर्धारीत वेळेपेक्षा उशिरा धावल्या. अजूनही वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे.
महाराष्ट्र बंदचा परिणाम लोकलसह मेट्रो आणि बससेवेवरही झाला. दिवसभरात एकूण ३,३७० बेस्टच्या बसपैकी ३२०८ बस रस्त्यावर उतरल्या. यापैकी ९० बसची तोडफोड करण्यात आली. त्यात ४ बसचालक जखमी झाले आहेत. आसारजी विश्वनाथ गरजे, अरुण मिरगळ, नितीन कमलाकर वाघमारे, शशिकांत गोसावी ही त्या बसचालकांची नावे आहेत.
शिवाय, मुंबईहून पुण्याला निघालेल्या ११ शिवनेरी बसेसपैकी ३ बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे ही सेवाही संध्याकाळी ५०.३० च्या नंतर सुरू करण्यात आली.