Advertisement

‘नो पार्किंग’चा जबर दंड की तोंड दाबून बुक्क्यांचा मार?

'नो पार्किंग'चा निर्णय जरी योग्य जरी असला तरी, पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करू न देता, दंड वसूल करणं चुकीचं असल्याचं वाहन चालकांच मत आहे.

‘नो पार्किंग’चा जबर दंड की तोंड दाबून बुक्क्यांचा मार?
SHARES

मागील अनेक वर्षांपासून मुंबईतील वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळं रस्त्यांवर वाहतूककोंडी होतं असून, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने बहुसंख्य वाहनचालक रस्त्यांवर व रस्त्यालगत अवैध पार्किंग करतात. या पार्किंगमुळं रस्त्यावरील वाहनकोंडीत आणखीनच भर पडते. या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी मुंबई महापालिकेनं नुकताच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक वाहनतळालगतच्या ५०० मीटर परिसरातील अवैध पार्किंग झाल्यास वाहनचालकांकडून ५ हजार ते १० हजार इतकी जबर दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. 'नो पार्किंग'चा निर्णय जरी योग्य जरी असला तरी, पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करू न देता, दंड वसूल करणं चुकीचं असल्याचं वाहन चालकांच मत आहे. यामुळे दंडाची रक्कम भरताना वाहनचालक आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत.

१४६ वाहनतळ 

महापालिकेचे शहरातील विविध परिसरात १४६ वाहनतळ आहेत. यामध्ये ३४ हजार ८०८ वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसंच, पार्किंगला शिस्त यावी आणि वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी संबंधित परिसरात महापालिकेच्या वाहतूक खात्याद्वारे आवश्यक ते सूचनाफलक बसविण्यात आले आहेत. महापालिकेकडून रविवारपासून अवैध पार्किंगवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या २३ ठिकाणच्या वाहनतळ परिसरात ५० हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात कारवाईचं नियोजन हे महापालिकेच्या संबंधित प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या स्तरावर करण्यात आलं आहे. तसंच, त्यांच्याकडून कारवाईचा दैनंदिन अहवाल तयार करून घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणं, कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात काही रस्ते 'नो पार्किंग झोन' ठेवले जाणार असून, तेथील अनधिकृत पार्किंगवर कारवाई केली जाणार आहे.

संतापाचं वातावरण

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेनं अनेक ठिकाणी रस्त्यालगत 'नो पार्किंग'चे फलक लावले आहेत. मात्र, काही ठिकाणी महापालिकेनं हे फलक लावले नसून, त्या ठिकाणावर देखील दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतील छोट्या-छोट्या भागांत वाहनांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे. त्याशिवाय वाहनतळांच्या तुलनेतही ही संख्या जास्त आहे. त्यामुळं महापालिकेच्या या निर्णयानं वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे. मुंबईतील वाहनतळांमध्ये ३ वाहनतळांची लवकर भर पडणार आहे. त्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून, करारनामा झाल्यानंतर हे वाहनतळ सुरू होतील. त्यामुळे सध्या २३ ठिकाणी असलेल्या सार्वजनिक वाहनतळांची संख्या २६ होईल.

सखल भागांत पाणी

पावसाळ्यात मुंबईतील अनेक सखल भागांत प्रचंड पाणी साचतं. त्यामळं प्रवासी आपली वाहनं रस्त्यालगत पार्क करतात. आता याठिकाणी वाहन पार्क करता येणार नाही. वाहन पार्क केल्यास दंडात्मक कारवाईला समोरं जावं लागणार आहे. 

दंडात्मक कारवाई

दंडात्मक कारवाईच्या निर्णयानुसार महापालिकेनं पहिल्या दिवशी ५६ वाहनांवर कारवाई केली. यामधील ९ जणांनी प्रत्येकी वाहनांच्या दंडानुसार शुल्क भरले. एकूण ९० हजार रुपये दंड भरून वाहनं सोडवली. तर उर्वरीत ४७ वाहनं महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारून परत दिली जाणार आहेत. त्याशिवाय, जेवढे दिवस वाहन ताब्यात असेल, तेवढ्या दिवसांसाठी वाहनांवर प्रतिदिन विलंब आकार लावण्यात येणार आहे. ही वाहने संबंधित मालकांद्वारे ३० दिवसांच्या आत सोडवून न नेल्यास ती बेवारस असल्याचं समजून त्यांची लिलावामध्ये विक्री केली जाणार आहे. त्यामुळं वाहन नो पार्किंगमध्ये पार्क केली आणि महापालिकेनं त्यावर कारवाई केली, तर 'दंड भरा आणि गाडी सोडवा' या पर्यायाशिवाय दुसरा पर्यायचं उपलब्ध राहणार नाही.

'इथं' होणार कारवाई 

आर्टेसिया बिल्डिंग, हिंद सायकल रोड लोअर परळ. वॉशिंग्टन हाऊस, डहाणूकर मार्ग, मलबार हिल. वांद्रे गाव वांद्रे जंक्शन, हिल रोड आणि आईस फॅक्टरी. तुंगवे गाव, साकी विहार रोड, कुर्ला पश्चिम. बुमरँग बिल्डिंग, चांदिवली फार्म रोड, कुर्ला. टोपीवाला मंडई, गोरेगाव रेल्वे स्टेशनजवळ. वन इंडिया बुल सेंटर, लोअर परळ. कोळेकल्याण गाव, सिग्नेस टॉवर, सातांक्रूझ. अपोलो मिल कम्पाऊंड, लोढा एक्सल, लोअर परळ. रूणवाल ग्रीन, जीएमएलआर रोड, नाहूर. कल्पतरू अॅवाना बिल्डिंग, जनरल नागेश मार्ग, परळ. इन्सिग्निया बिल्डिंग, कलिना-सीएसटी रोड, सातांक्रूझ. रूणवाल अँथोरियम, एचपी पेट्रोलपंपाजवळ, मुलुंड पश्चिम. लोढा सुप्रीम बिल्डिंग, कांजूरगाव रोड. रूणवाल बिल्डिंग, रूईया बंगला, मलबार हिल. उमिया माता मंदिर, विश्वेश्वर रोड, गोरेगाव. 

मोफत पार्किंग 

रूणवाल बिल्डिंग, ओशिवरा लिंक रोड, अंधेरी पश्चिम. वाधवा ग्रुप, आर सिटी मॉल, विक्रोळी पश्चिम. हब मॉलजवळ, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगाव. द पार्क, कमला मिल, लोअर परळ. इंडिया बुल फायनान्स सेंटर, सेनापती बापट रोड, प्रभादेवी. विकास पालोझो बिल्डिंग, मुलुंड पश्चिम. वर्ल्ड टॉवर, कमला मिलजवळ, लोअर परळ. 

नो पार्किंग क्षेत्रात वाहनं आढळल्यास दंड

  • दुचाकी  - ५ हजार रुपये दंड. 
  • रिक्षा, साइडकार (दुचाकी, तीन चाकी)  -  ८ हजार रुपये दंड.
  • चारचाकी  -  १० हजार रुपये दंड.
  • मध्यम आकाराची वाहने  -  ८ हजार रुपये दंड.
  • अवजड वाहने  -  १५ हजार रुपये दंड.

८ लाख वसूल

महापालिकेनं ७ जुलैपासून बेकायदा पार्किंगविरोधात सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत ८ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईच्या तिसऱ्या दिवशी ५३ चारचाकी, ५१ दुचाकी आणि ३ तीनचाकी अशा १०७ बेकायदा पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून ५ लाख १९ हजार ४६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.हेही वाचा -

भाडेकपातीनंतर बेस्टच्या ३ मार्गावर एसी बसेस


Disclaimer: All views expressed in this article are personal and purely as per the author. Mumbai Live holds no opinion on the content of the article and does not promote any particular view or sentiment.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा