Advertisement

बेस्ट दरवाढीवर शिक्कामोर्तब! मुंबईकरांच्या खिशाला चाट पडणारच!

बुधवारी बेस्ट प्रशासन आणि मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटी (एमएमआरटीए) यांच्यात झालेल्या बैठकीत दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार बेस्टच्या दरात १ रूपयांपासून १२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर एसी बसच्या दरात ५ रुपये ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

बेस्ट दरवाढीवर शिक्कामोर्तब! मुंबईकरांच्या खिशाला चाट पडणारच!
SHARES

बेस्ट प्रशासनाने १२ एप्रिलपासून बेस्टच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी बेस्ट प्रशासन आणि मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटी (एमएमआरटीए) यांच्यात झालेल्या बैठकीत दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार बेस्टच्या दरात १ रूपयांपासून १२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर एसी बसच्या दरात ५ रुपये ते १० रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होईल, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


३० लाख बेस्ट प्रवाशांवर भार

तोट्यात चालणाऱ्या बेस्टला वर आणण्यासाठी बेस्टच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी बेस्ट प्रशासनानं मंजूर करून घेत ३० लाख बेस्ट प्रवाशांवर अतिरिक्त भार टाकला आहे. नव्या दरवाढीनुसार पहिल्या ४ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. ६ किमी अंतराच्या प्रवासासाठी जिथे याआधी १४ रुपये मोजावे लागत होते, तिथे आता १५ रुपये तर ८ किमी अंतराच्या प्रवासासाठी १६ रुपयांएेवजी आता १८ रुपये मोजावे लागतील. तर ५० किमी अंतराच्या प्रवासासाठी आता ५० रुपयांएेवजी ६२ रुपये मोजावे लागणार आहे.



ठंडा ठंडा कूल कूल प्रवासही महागला

बेस्टने एसी बसच्या दरातही वाढ केली असून ५ रुपये ते १० रुपये अशी ही वाढ आहे. एसी बसच्या ६ किमी अंतराच्या प्रवासासाठी जिथे आतापर्यंत २५ रुपये मोजावे लागत होते, तिथे आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत. तर एसी बसच्या ५० किमीच्या प्रवासासाठी १३० एेवजी आता १४० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा आता ठंडा ठंडा कूल कूल बेस्ट प्रवासही महागणार असल्यानं ऐन उकाड्यात मुंबईकरांना घाम फुटणार आहे.


पासच्या दरातही वाढ

तिकीट दराबरोबरच बेस्टने पासच्या दरातही वाढ केली आहे. दैनंदिन पास, मासिक पाससह सहामाही पासमध्येही मोठी दरवाढ करण्यात आली आहे. प्रौढांना शहरांतर्गत प्रवासासाठीच्या दैनंदिन पाससाठी आता ४० रुपयांएेवजी ५० रुपये, तर लहान मुलांसाठी २० रुपयांएेवजी २५ रुपये मोजावे लागणार आहेत. उपनगरातील प्रवासासाठीच्या दैनंदिन पाससाठी ५० रुपयांएेवजी ६० रुपये असे प्रौढांसाठीचे दर असतील, तर लहान मुलांसाठी २५ रुपयांएेवजी ३० रुपये असे दर असतील. तर सर्वत्र प्रवासासाठीच्या ७० रुपयांच्या पाससाठी आता ९० रुपये मोजावे लागणार आहेत.



हेही वाचा

मुंबईकरांच्या दिमतीला हायब्रिड बस


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा