बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो इकडं लक्ष द्या, येत्या गुरूवारपासून तुमच्या खिशाला बसणारी झळ आणखी वाढू शकते. याचं कारण म्हणजे बेस्ट प्रशासन गुरूवार १२ एप्रिलपासून बेस्ट बसच्या तिकीटांच्या दरांत वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ ४ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी असू शकते.
सद्यस्थितीत बेस्ट प्रशासनाद्वारे दररोज ५०० बस मार्गावर बस सेवा दिली जाते. ज्याद्वार ३० लाख प्रवासी मुंबई, ठाणे, नवी मुंबई असा प्रवास करतात.
बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला असून तिकीट दरवाढीचा हा प्रस्ताव बुधवारी परिवहन विभागाअंतर्गत येणाऱ्या मुंबई मेट्रोपोलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथाॅरिटी (एमएमआरटीए) पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली
बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ४ किमीपेक्षा अंतरासाठी किमान १ रुपये ते १२ रुपयांच्या दरम्यान ही वाढ अपेक्षित आहे. तर ४ किमी अंतराच्या आत कुठलीही दरवाढ होण्याची चिन्हे नाहीत. एसी बसच्या तिकीटांत किमान ५ रुपयांची वाढ होऊ शकते. यानुसार बेस्टने काही दिवसांपूर्वीच बोरीवली, ठाणे, मुलुंड आणि खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान सुरू केलेल्या हायब्रिड एसी बसच्या तिकीटांमध्येही १५ ते २० रुपयांची वाढ होऊ शकते.
बेस्टच्या बस पासमध्येही ७० ते ९० रुपयांची वाढ होऊ शकते. यातून विद्यार्थीही सुटणार नाहीत, कारण त्यांच्या बस पासमध्ये ५० रुपयांची वाढ अपेक्षित आहे.
प्रशासनाने ४० टक्के अनावश्यक फेऱ्या रद्द केल्यामुळे तसंच नव्याने होणाऱ्या दरवाढीमुळे बेस्टच्या मानेवरचं ओझं दररोज काही लाखांनी कमी होऊ शकतं. बेस्टच्या २०१८-१९ अर्थसंकल्पात ८८० कोटी रुपयांची तूट दाखवण्यात आली होती. पण धोरणात्मक निर्णयामुळे ३३७ कोटी रुपयांपर्यंत ही तूट खाली आणण्यात प्रशासनाला शक्य झालं आहे.
हेही वाचा-
१ एप्रिलपासून बेस्ट बसचे भाडे वाढणार
मार्चपासून 'सिंगल तिकीट' प्रणालीवर काम सुरू