कर्ज फेडण्यासाठी महापालिकेची बेस्टला १२०० कोटींची मदत

मागील अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून आणखी १२०० कोटींचे कर्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

SHARE

मागील अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून आणखी १२०० कोटींचे कर्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. विविध बँकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. मात्र हे कर्ज बिनव्याजी असल्यानं बेस्टला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या प्रस्तावाला सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

विविध बँकांचं कर्ज

बेस्ट उपक्रमावर विविध बँकांचे सुमारे २ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमाला या कर्जावरील व्याजापोटी वार्षिक २०० कोटी रुपये जमा करावे लागत आहेत. या कर्जातून बेस्ट उपक्रमाची सुटका झाल्यास नवीन बस खरेदी, नव्या योजना, कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत काढणं शक्य होणार आहे. त्यामुळं, बेस्टला १६०० कोटी रुपये कर्ज देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पालिका प्रशासनाने १२०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम विविध बँकांमधील आपले थकीत कर्ज फेडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला वापरता येणार आहे.

गटनेत्यांची बैठक

दरमहा १०० कोटी रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाला. मात्र पालिका प्रशासनानं प्रत्यक्षात ६०० कोटी रुपये मंजूर केले. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाला मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यामुळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झालं आहे.

फक्त कर्ज फेडण्यासाठी

त्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्यानं बेस्ट उपक्रमाला आपले दैनंदिन खर्च भागविण्यासाठी कर्ज घ्यावं लागलं. कामगारांचे वेतन देणंही अवघड झालं होतं. अशाने कर्ज वाढत गेले असून, बेस्ट उपक्रमावर सध्या २ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळं पालिकेनं १२०० कोटींचं बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. मात्र, बेस्टला या रक्कमेचा वापर केवळ कर्ज फेडण्यासाठीच करता येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या