Advertisement

अंधेरीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरी विरार रेल्वे सेवा ठप्प


अंधेरीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरी विरार रेल्वे सेवा ठप्प
SHARES

मंगळवारी पहाटेपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून सकाळी आठच्या दरम्यान अंधेरी रेल्वे स्थानक इथं पादचारी पुलाचा भाग कोसळला. रेल्वे रुळावर गोखले पुलाचा भाग कोसळल्यानं अंधेरी ते विरार रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर रस्ते वाहतुकही ठप्प आहे. 

ढिगारा काढण्याच काम युद्धपातळीवर सुरू

दरम्यान रेल्वे, महापालिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे. पण पावसामुळे हा ढिगारा काढण्यात अडचणी येत आहेत. हा ढिगारा काढण्यायासाठी आणखी बराच वेळ लागणार असल्यानं याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होणार आहे. दरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी जोगेश्वरी ते गोरेगाव रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.

अपघातामुळ ओव्हरहेड वायरचं नुकसान

अंधेरी स्थानकातील सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात प्लॅटफॉर्म क्रमांक सात व आठ जवळील पादचारी पुलाचा काही भाग सुरूवातीला कोसळला. आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच पुलाचा इतर भागही रेल्वे रुळावर पडला. यामुळं अनेक ओव्हरहेड वायर तुटल्यानं रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसच या अपघातात प्लॅटफॉर्मचे बरेच नुकसान झालं आहे.

नऊ जण जखमी

या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून रूग्णांना तातडीनं जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

लोकल ट्रेन ठिक ठिकाणी थांबल्याने डबेवाले जागोजागी अडकून पडले आहेत. परिणामी डबेवाल्यांची सेवा बाधीत झाली आहे. त्यामुळे डबेवाले कार्यकारणीने डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरातूनच जेवणाचे डबे घेऊ नका, घेतले असतील तर ते परत करा - सुभाष तळेकर, प्रवक्ता, मुंबई डबेवाला असोसिएशन

मेट्रो स्थानकात प्रवाशांची गर्दी

अंधेरीत पूल कोसळल्याच्या आणि लोकल ठप्प झाल्याचं वृत्त पसरल्यानं काही चाकरमान्यांनी कार्यालयांऐवजी परतीचा रस्ता धरला. तर, काहींनी कार्यालयात पोहोचण्यासाठी बस आणि मेट्रोकडं धाव घेतली. त्यामुळं बस आणि मेट्रो गाड्यांची गर्दी वाढली आहे. अनेक लोक अंधेरी मेट्रो स्थानकातच थांबून राहिल्यानं तिथंही मोठी गर्दी झाली आहे.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वे पूर्ववत होण्यास मध्यरात्र उजाडणार!

...आणि सावंत ठरले देवदूत

सात वर्षांपूर्वी पालिकेनं पुलाच्या डागडुजीसाठी दिले होते रेल्वेला पैसे




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा