मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं नेरूळ / बेलापूर-खारकोपर विभागात उपनगरी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २० नोव्हेंबरपासून नेरूळ ते खारकोपर आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान प्रत्येकी ४ उपनगरी सेवा अशा एकूण ८ सेवांचं नियोजन करण्यात आलं आहे.
सध्या मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर दररोज १,५७२ उपनगरी सेवा चालवित आहे. अशातच चौथ्या मार्गिकेवर म्हणजेच नेरुळ/बेलापूर - खारकोपर मार्गावर ८ उपनगरी सेवा जोडल्या गेल्यास २० नोव्हेंबरपासून एकूण १५८० सेवा होणार आहेत.
उपनगरी सेवांचं वेळापत्रक
सध्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं अद्याप सर्वसामान्य पुरूष प्रवासी रेल्वे प्रवासाच्या प्रतिक्षेत आहेत. शिवाय, कधी रेल्वे प्रशासन लोकल सुरू करणार असा प्रश्न अनेक प्रवासी संघटनांसह स्थानिक प्रवाशांना पडला आहे.