Advertisement

कोकण रेल्वेमार्गावर आता नियमितपणे धावणार दादर-सावंतवाडी विशेष गाडी

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनानं कोकण रेल्वे मार्गावर गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वेमार्गावर आता नियमितपणे धावणार दादर-सावंतवाडी विशेष गाडी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ७ महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमीतपणे एकही ट्रेन धावली नाही. त्यामुळं प्रवाशांना आपला खिसा रिकामा करून खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता. मात्र, प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनानं कोकण रेल्वे मार्गावर गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दादर-सावंतवाडी विशेष गाडी नियमितपणे धावणार आहे.

येत्या शनिवार २६ सप्टेंबरपासून ही गाडी नियमितपणे धावणार आहे. याबाबत मध्य रेल्वे कडून पत्रक जारी करण्यात आलं असून गेल्या ७ महिन्यांपासून प्रवासकोंडीत अडकलेल्या कोकणवासीयांसाठी हा सर्वात मोठा दिलासा ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यासोबतच मुंबईतील लोकलसह देशभरातील रेल्वेसेवेला ब्रेक लागला. दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भारतीय रेल्वेकडून देशभरात प्रमुख मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या.

या गाड्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. यातील काही निवडक गाड्या कोकण रेल्वेमार्गावरून दक्षिणेकडील राज्यांत सध्या जात आहेत. मात्र कोकणातील प्रवाशांसाठी मात्र एकही विशेष गाडी सोडण्यात आली नव्हती. दादर-सांवतवाडी विशेष ट्रेनच्या घोषणेनं कोकणवासीयांनी आता हक्काची गाडी मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दादर-सावंतवाडी विशेष ट्रेनबाबत संपूर्ण तपशील जारी केला आहे. ही गाडी २६ सप्टेंबरपासून नियमितपणे चालवली जाणार आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत ही गाडी मान्सूनच्या वेळापत्रकानुसार चालवली जाईल व त्यानंतर १ नोव्हेबरपासून गाडीची वेळ नॉन-मान्सून वेळापत्रकानुसार असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांना कोविड- १९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल, असे नमूद करण्यात आले आहे. केवळ आरक्षण असेल तरच या गाडीतून प्रवास करता येणार आहे.

दादर ते सावंतवाडी विशेष ट्रेन

०१००३ ही विशेष गाडी दादरहून दररोज ००.०५ वाजता दिनांक २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल.

०१००४ ही विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज सायंकाळी ५.३० वाजता दिनांक २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० दरम्यान सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दादरला सकाळी ०६.४५ वाजता पोहचेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा