फुकट्यांकडून 'मरे'ची 20 कोटी 74 लाखांची वसूली

  Mumbai
  फुकट्यांकडून 'मरे'ची 20 कोटी 74 लाखांची वसूली
  मुंबई  -  

  मुंबईची लाईफलाईन ठरलेल्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणे, विनातिकीट प्रवास करणे, अशा घटनांची संख्याही वाढतच आहे. त्यामुळे अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध मे महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत मध्यरेल्वेने 20 कोटी 74 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मे महिन्यात फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण 3 लाख 66 हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. तर गेल्यावर्षी मे महिन्यात 2 लाख 22 हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यातून 11 कोटी 30 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. मे महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत आपले आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणाऱ्या 710 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 6 लाख 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

  मध्य रेल्वे मार्गावर एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये 7 लाख 25 हजार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या कालावधीत 41 कोटी 22 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनातर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये,असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.