मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  Mumbai
  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  मुंबई  -  

  विक्रोळी आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान झालेला सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले असून मध्य रेल्वेवरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या दोन स्थानकांदरम्यान असलेल्या सिग्नल यंत्रणेत मंगळवार सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला होता. यामुळे अप आणि डाऊन अशा धिम्या मार्गांवरील दोन्ही बाजूंची वाहतूक खंडीत होऊन मध्य रेल्वेवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे पूर्णपणे विस्कळीत झाली. विक्रोळी स्थानकाजवळ सावंतवाडी पॅसेंजरसह लोकल गाड्यांची रांग लागली होती. परिणामी 17 गाड्या रद्द करण्यात आल्या. याचा फटका सायंकाळच्या वेळेस घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना बसला असून प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.    

  कार्यालये सुटण्याच्या वेळीच हा बिघाड झाल्याने हळूहळू स्थानकांवरील गर्दी वाढत आहे. धिम्या मार्गासोबतच जलद मार्गावरील गाड्याही उशीराने धावत असल्याची उद्घोषणा होत आहे. प्रवाशांच्या सोईसाठी 3 विशेष लोकल चालवूनही गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नेहमीच्या गाेंधळाने ऐन गर्दीच्या वेळेत हाल होत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. 


   


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.