Advertisement

Coronavirus: कोरोना व्हायरसमुळं सार्वजनिक वाहतुकीला फटका

राज्य सरकारच्या या निर्णयामुळं व कोरोनाच्या भितीमुळं अनेक नागरिक घराबाहेर न पडणं पसंत करत असून, घरी राहून योग्य ती काळजी घेत आहेत. मात्र, या परिणाम राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर होत आहे.

Coronavirus: कोरोना व्हायरसमुळं सार्वजनिक वाहतुकीला फटका
SHARES

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं नागरिक खबरदारी घेत आहेत. राज्यत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. ही संख्या आणखी वाढू नये यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. देशभरातील नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात जनजागृती करत आहे. तसंच, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं व कोरोनाच्या भितीमुळं अनेक नागरिक घराबाहेर न पडणं पसंत करत असून, घरी राहून योग्य ती काळजी घेत आहेत. मात्र, या परिणाम राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. त्यानुसार, सुरक्षेसाठी शाळा, कॉलेज, थिएटर्स, पार्क, जलतरण, जिमखाने, चित्रपट (Picture) व मालिकांचे (Serials) चित्रीकरणही (Shooting) बंद करण्यात बंद करण्यात आले आहेत. कंपन्या बंद असल्यानं वाहतुकीसाठी प्रवासी घरा बाहेर पडत नाही आहेत. यामुळं एसटी, ओला, लोकल, बेस्ट, टॅक्सी, रिक्षा व इतर खासगी सेवांना तोटा सहन करावा लागतो आहे.

लोकलची गर्दी कमी

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलनं दररोज लाखोच्या संख्येनं प्रवासी प्रवास करत असून, त्यांना या कोरोना व्हायरसचा धोका आहे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठी आणि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचल्यानं सरकारनं कडक उपाययोजना करण्यात निर्णय घेतला आहे. परिणामी, प्रवासी नसल्यानं या सार्वजनिक सेवांच्या उत्पन्नात घट होत आहे.

अनेक मुंबईकरांनी लोकलच्या गर्दीचा धसका घेतला असून, संसर्गापासून वाचणं शक्य होईल की नाही याची खात्री देता येत नसल्याने अनेकजण गर्दीनं नेहमीच ओसांडून वाहणाऱ्या लोकल ट्रेनला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं लोकल ट्रेनमधील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्याशिवाय, स्थानकातील खाण्यापिण्याचे स्टाॅल्स, चाय टॅपरी, पानाच्या टपऱ्यांवरील गर्दीही कमी झाली आहे. त्यामुळं उत्पन्नात घट होत आहे.

दररोज ८० ते ९० लाख प्रवासीसंख्या असलेल्या लोकलवरील ही घट अद्याप पुरेशी नसली तरी, कोरोनाच्या धास्तीमुळं रेल्वेप्रवास टाळण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. १६ मार्चला रेल्वेनं ९० लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यात पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांमधून ४० लाख ७५ हजार ७०५ आणि मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग, हार्बर, ट्रान्स हार्बर वरील लोकलमधून ४९ लाख ४१ हजार ५६४ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. १७ मार्चला या प्रवासी संख्येत घट झाली. पश्चिम रेल्वेवरून १७ मार्चला ३२ लाख ६० हजार ८७८ प्रवाशांनी आणि मध्य रेल्वेवरून ३९ लाख ७७ हजार ३२१ प्रवाशांची नोंद झाली आहे. एका दिवसात ९० लाखांपैकी १७ लाख ७९ हजार प्रवासी कमी झाले आहेत.

बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्टनं प्रवास करणारे चाकरमानी देखील प्रवास टाळत असल्यानं बेस्टला त्याचा फटका बसत आहे. मागील काही दिवसांत त्यांच्या बेस्टच्या प्रवासी (Passengers) संख्येत घट झाली आहे. बेस्टनं भाडेकपातीचा निर्णय घेतल्यानंतर प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, सध्या राज्यावर असलेलं कोरोना व्हायरसचं (Coronavirus) सावट यामुळं या आठवड्यांत यात घट झाली आहे. सोमवारी १ लाख ३९ हजार, तर बुधवारी १ लाख २५ हजार प्रवासी संख्या घटल्याचं समोर आलं आहे. २ मार्चला बेस्ट बसगाड्यांमधून ३२ लाख २७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. परंतु, ९ मार्च रोजी ३० लाख ८८ हजार लोकांनी प्रवास केला, तर बुधवारी ४ मार्च रोजी ३२ लाख २२ हजार लोकांनी प्रवास केला होता. ही संख्या ११ मार्च रोजी ३० लाख ९७ हजार झाली.

मुंबईतील सद्यस्थितीचा विचार करता कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रवाशांनी बेस्ट बसगाड्यांमधून कृपया उभ्यानं प्रवास करू नये, असं आवाहन बेस्ट (BEST) प्रशासनानं केलं आहे. लोकलं, खाजगी बस, एसटी यांसह बेस्टनंही आपल्या ताफ्यातील बस स्वच्छ करत आहे.

एसटी महामंडळाचा महसूल बुडाला

करोनाच्या दहशतीमुळे एसटी महामंडळाला फटका बसला आहे. प्रवासी नसल्यानं ११ मार्च ते १५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाला एकूण ७ हजार ७०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळं १ कोटी ४३ लाख रुपये महसूल बुडाल्याची माहिती महामंडळाने दिली. यातही शिवनेरी बसकडं प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. एसटी महामंडळानं १ मार्चपासून 'प्रवासी वाढवा' अभियान सुरू केलं. मात्र, कोरोना व्हायरसमुळं 'प्रवासी वाढवा' अभियानात अडथळे येत आहेत. राज्यभरातील बहुसंख्य प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पुणे या भागातील एकूण ३ हजार ६२० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, रायगड, ठाण्यातील एकूण २ हजार १८१ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई ते पुणे ते मुंबई, ठाणे ते पुणे ते ठाणे मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बस गाड्या धावतात. मात्र, या फेऱ्यांमधून कमी प्रवासी जात आहेत. काही फेऱ्यांसाठी प्रवासीच नसल्यानं २०७ फेऱ्या रद्द केल्याची माहिती मिळते.

मेल-एक्स्प्रेसचे तिकीट रद्द

बाहेरगावी जाण्याचा बेत मेल-एक्स्प्रेस प्रवाशांनी रद्दच केल्यानं मध्य रेल्वेचाही महसूल बुडत आहे. ४ मार्चपासून मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यास सुरुवात केली आहे. ४ मार्च ते ११ मार्च २०१९ शी तुलना करता २०२० मधील याच काळात रद्द करण्याचे प्रमाण दुपटीनं वाढल्याचे समोर आलं आहे.

टॅक्सी उपलब्ध असूनही प्रवासी नाही

मुंबईतील रस्त्यांवर नेहमी प्रवाशांचे रिक्षा व टॅक्सी चालकांचे भाडं नाकारत असल्यामुळं वाद होतात. मात्र, टॅक्सी उपलब्ध असूनही प्रवासी नसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रिक्षा, टॅक्सी हे सार्वजनिक वाहतुकीचा भाग असल्यानं प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

भाडं स्विकारताना विचार

करोनाच्या धास्तीमुळं अनेक ओला, उबर चालक भाडं स्विकारता विचार करत आहेत. कारण, प्रवासी प्रवास टाळत असल्यानं एखाद्या प्रवाशाला 'मुंबई ते नवी मुंबई' किंवा 'मुंबई ते घाटकोपर' असा प्रवास करायचा झाला तर ओला, उबर चालकाला प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी सोडून परतीच्या प्रवासासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अनेकांनी करोनाचा प्रभाव नष्ट होईपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांची वाहतूक करणं बंद केलं आहे. काही वाहनचालकांनी तर प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद करत घरी बसणं पसंत केलं आहे.

रस्ते वाहतुकीत घट

तुलनेत रस्त्यांवरील वाहतूक कमी झाली आहे. बुधवारी पूर्व उपनगरातील काही रस्त्यांवर शुकशुकाट होता. पूर्व उपनगरातील शीव-पनवेल महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड आणि एलबीएस रोड या ठिकाणी इतर दिवसांच्या तुलनेत बुधवारी तुरळक प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर पंतनगर रोड या ठिकाणी तर गेल्या वर्षभरापासून मेट्रोचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र बुधवारी या दोन्ही रस्त्यांवर वाहनांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याइतकी होती.



हेही वाचा -

Corona Virus कोरोना विलगीकरणाचा शिक्का असताना केला रेल्वेतून प्रवास

Coronavirus Updates: 'या' १० खाजगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा