Advertisement

लवकरच मुंबईहूनही सुटणार विशेष रेल्वे, मुख्यमंत्र्यांचे संकेत

परप्रांतीय मजुरांना लाॅकडाऊनच्या काळात त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी मुंबईतूनही लवकरच विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येऊ शकते.

लवकरच मुंबईहूनही सुटणार विशेष रेल्वे, मुख्यमंत्र्यांचे संकेत
SHARES

परप्रांतीय मजुरांना लाॅकडाऊनच्या काळात त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी मुंबईतूनही लवकरच विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येऊ शकते. मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मजुरांना केलं आहे. मुंबई रेड झोनमध्ये येत असल्याने शहरातून एकही ट्रेन सोडणार नाही, असं याआधी सरकारने स्पष्ट केलं होतं. परंतु परप्रांतीयांचा मुद्दा आणखी बिकट होत चालल्याने सरकार सतर्क झालं आहे. 

औरंगाबादजवळील करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल खेद व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले. 

बाहेर पडू नका

परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे, त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाऊस्तोवर आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मजुरांना केलं आहे. महाराष्ट्रातून सध्या ठराविक रेल्वे स्थानकांवरुन विशेष श्रमिक ट्रेनद्वारे परप्रांतीयांना रवाना केलं जात आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत १ लाखांहून अधिक परप्रांतीयांना राज्य सरकारने रवाना केलं आहे. 

हेही वाचा - परप्रांतीयांच्या शोधासाठी भरारी पथकं नेमा, शरद पवारांची सूचना

घरी जाण्यासाठी उतावीळ 

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला अंदाजे २० ते ३० लाख परप्रांतीय मजूर आहेत. लाॅकडाऊनमुळे हे परप्रांतीय मजूर राज्यातील विविध भागात अडकलेले आहेत. केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवतानाच एका राज्यांतून दुसऱ्या राज्यांत जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांना काही अटींवर प्रवासासाठी मुभा दिली. परंतु या अटींची पूर्तता न करताच किंवा राज्य शासनाकडून होणाऱ्या व्यवस्थेची वाट न बघताच हे परप्रांतीय मजूर सायकल, रिक्षा, ट्रक, टेम्पो, कार अशा मिळेल त्या साधनाने घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पैसा अडका गाठीशी नसलेले मजूर तर आपल्या कुटुंबकबिल्यासहित पायीच चालत निघाले आहेत. त्यातच काही ठिकाणी ते दुर्दैवाने अपघातांना बळी पडत आहेत. 

सरकार पैसे देणार

त्यामुळे आता राज्य सरकारनेही या मजुरांबाबत कडक पवित्रा घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आपापल्‍या राज्‍यात जाऊ इच्छिणाऱ्या परराज्‍यातील मजुरांना रेल्‍वेने पाठविण्‍याचे नियोजन करण्यात आलं असून परप्रांतीयांच्या प्रवासाचा खर्च राज्‍य शासन किंवा सीएसआर फंडातून केला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शहरातील ज्‍या भागात कोरोनाबाधित अधिक आहेत, तेथून कोणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येवू नये, असे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. 

केंद्र व संबंधित राज्यांच्या सहकार्यानं सर्व मजुरांना त्यांच्या राज्यांत पाठविण्यात येत आहे, परंतु आपला नंबर येईपर्यंत, त्यासाठीची व्यवस्था होईपर्यंत मजूरबांधवांनी धीर धरावा. जीव धोक्यात घालून असुरक्षित प्रवास करु नये, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - Coronavirus Update: संचारबंदीतही राज्यातील नागरीक मोकाट, तब्बल 1 लाख गुन्ह्यांची नोंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा