Advertisement

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, अडीच लाखांवरून १५ लाखांवर

रेल्वे सेवा बंद असल्यानं दररोज लाखो प्रवाशांची बसगाड्यांमध्ये गर्दी होत आहे.

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, अडीच लाखांवरून १५ लाखांवर
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनच्या बेस्टनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवली. त्याशिवाय लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं खुलं होत असताना प्रवासासाठी मुंबईकरांकडं केवळ बेस्ट उपक्रमाची बसगाडी हेच वाहतुकीचं माध्यम उरलं आहे. रेल्वे सेवा बंद असल्यानं दररोज लाखो प्रवाशांची बसगाड्यांमध्ये गर्दी होत आहे.

मागील ३ महिन्यांच्या कालावधीत बेस्ट प्रवाशांची संख्या अडीच लाखांवरून १५ लाखांवर पोहोचली. त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळणं मोठं आव्हान ठरत आहे. लॉकडाऊनपूर्वी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र जून महिन्यात प्रवाशांची संख्या अडीच लाख एवढी होती. ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईत दररोज ३ हजार ४०० बसगाड्या धावत असून, दररोज सरासरी १५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत.

बसफेऱ्या कमी होत असल्यानं कार्यालयात वेळेत जाण्यासाठी प्रवासी बसगाड्यांमध्ये गर्दी करून प्रवास करीत आहेत. त्यामुळं मुंबईकरांसाठी वाहतुकीचे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी केली जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर २४ मार्चपासून लोकल सेवा बंद करण्यात आली. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी मोठा दिलासा दिला.

३ जूनपासून लॉकडाऊन खुले होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली. ३ महिन्यांनंतरही लोकल सेवा अद्याप बंदच असल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज गर्दी वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बेस्टच्या सिंगल डेकर बसगाडीमधून २५ प्रवासी बसून, तर ५ जण उभ्यानं प्रवास करू शकतात. तर मिनीबस गाड्यांमधून केवळ १० प्रवासी बसून प्रवास करू शकतात. डबल डेकरमध्ये ४५ प्रवासी बसून आणि पाच प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात, असा नियम आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे १६२२ नवे रुग्ण, ३४ जणांचा दिवसभरात मृत्यू

राज्यात १७ हजार ४३३ नवे रुग्ण, पहा तुमच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या किती झाली


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा