Advertisement

मुंबईच्या वेशीवर आणि शहरात वाहनांची गर्दी वाढली


मुंबईच्या वेशीवर आणि शहरात वाहनांची गर्दी वाढली
SHARES

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. तसंच, अनेक सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत. असं असलं तरी सोमवारी मुंबईच्या वेशीवर आणि शहरात वाहनांची गर्दी वाढली. मद्याची दुकानं सुरु होतील या आशेवर फिरणाऱ्या आणि विनाकारण भटकणाऱ्यांमुळं रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. लॉकडाऊनमुळं १७ मेपर्यंत वाढ केल्यानंतर काय सुरु होणार आणि काय बंद राहणार यावर एकूणच संभ्रम दिसून आला. त्यामुळे सोमवारी अनेक दुकानं उघडतील या आशेवर अंतर्गत रस्त्यावरील वर्दळीत वाढ झाली.

सोमवारी मुंबईच्या वेशीवरील नाकाबंदीची ठिकाणं आणि टोलनाक्यांवर वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. मुंबईत प्रवेश करु इच्छिणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांचे ओळखपत्र तपासण्यांमुळे वेशीवरील नाकाबंदीच्या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडीच झाली. त्याचबरोबर प्रवासाची मुभा असणारे ओळखपत्र किंवा योग्य ती कागदपत्रे नसल्याने अनेक नागरीकांची पोलीसांशी हुज्जत सुरु होती.

ठाणे-मुलुंडच्या दरम्यान कोपरी पूलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने आधीच चिंचोळा झालेल्या या मार्गावर त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. तुलनेने टोलनाक्यावर गर्दी कमी होती. गेला महिनाभर बऱ्यापैकी मोकळ्या असणाऱ्या द्रुतगती मार्गांवरदेखील वाहनांची सततची वर्दळ सोमवारी सुरु झाली.  दुसरीकडे महिनाभर सुरु असलेली पोलीसांची शहरांतर्गत नाकाबंदी अनेक ठिकाणी शिथिल झालेली दिसून आली. अनेक ठिकाणी कोणतेही ओळखपत्र नसतानादेखील दुचाकीवरुन दोन-दोन प्रवाशांची ये-जा सर्रास सुरु होती. काही ठिकाणी तर चार चाकी वाहनांत परवानगीपेक्षा अधिक प्रवासीदेखील दिसत होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा