लॉकडाऊनमुळे (lockdown) महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास २ लाख ४५ हजार कामगारांची (Migrant workers) पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिली आहे.
२२ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून १९१ ट्रेनने २ लाख ४५ हजार ०६० कामगार, मजुरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली.
पश्चिम बंगाल व बिहार
पश्चिम बंगालमध्ये एकही ट्रेन गेली नव्हती व बिहारमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तीशः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोनद्वारे विनंती केल्यावर त्यांनी परवानगी दिली. १६ रोजी सकाळी ८.१५ वाजता पश्चिम बंगाल साठी वांद्रे ते हावडा ही पहिली विशेष रेल्वे ट्रेन सोडण्यात आली. या दोन्ही राज्यांसाठी प्रत्येकी कमीत कमी १० ट्रेन दररोज सोडण्याची गरज आहे. या परप्रांतीय कामगारांना पाठविण्याचा सर्व खर्च मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आला आहे. यासाठी एकूण ५४.७० कोटी रुपये त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवलं, ठाकरे सरकारचा निर्णय
राज्यात जवळपास ३८८४ शेल्टर असून यामध्ये ३ लाख ७१ हजार कामगार आहेत त्यांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था राज्य शासन करत आहे.
१९१ विशेष श्रमिक ट्रेन
राज्याच्या विविध भागातून १ मे पासून १५ मे पर्यंत राज्यातील विविध स्टेशनवरून १९१ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे या सर्वांना पाठविण्यात आलं.
यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (११७), राजस्थान (९), बिहार (२६), कर्नाटक (३), मध्यप्रदेश (२१), जम्मू (२), ओरिसा (७), झारखंड (५), आंध्र प्रदेश (१) या ९ राज्यांचा समावेश आहे.
भिवंडी ६, डहाणू १, कल्याण २, पनवेल १३, ठाणे ५, लोकमान्य टिळक टर्मिनस ३०, सीएसटी ३५, वसई रोड ७, पालघर ३, बोरिवली ९, वांद्रे टर्मिनस १८, अमरावती २, अहमदनगर २, मिरज ४, सातारा ४, पुणे १४, कोल्हापूर ९, नाशिक रोड ४, नंदुरबार ४, भुसावळ १, साईनगर शिर्डी २, जालना २, नागपूर ४, औरंगाबाद ६, नांदेड १, कुर्डूवाडी १, दौंड १ या स्टेशन वरून उपरोक्त श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.
हेही वाचा - महाराष्ट्रात उद्योग सुरू करा, सुभाष देसाई यांचं उद्योजकांना आवाहन