Advertisement

रस्ता बंद त्यात टोलचा भुर्दंड!

बेलापूरसह एेरोली आणि मुलुंडमध्ये वाहनांची प्रचंड कोंडी झाली आहे. त्यातच ऐरोली टोलनाक्यावर सुरू असलेल्या टोलवसुलीमुळे प्रवाशांच्या खिशालाही खार लागत आहे. शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांनी हा टोलनाका बंद पाडल्यानंतरही सकाळी वसुली पुन्हा सुरू झाली. त्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आ. एकनाथ शिंदे यांनी या टोलनाक्यावर कारवाई करण्याचे संकेत देत एकाच ठिकाणी टोल भरण्याचं आवाहन प्रवाशांना केलं आहे.

रस्ता बंद त्यात टोलचा भुर्दंड!
SHARES

नेरूळ ते बेलापूर हार्बर मार्गावरील ७२ तासांचा जम्बोब्लाॅक आणि कळवा-विटावा-एेरोली-बेलापूर रस्ता पुढचे ४ दिवस बंद असल्याने नवी मुंबईकर आणि ठाणेकरांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. बेलापूरवरून ठाणे-नाशिकला जाण्यासाठी प्रवाशांना एेरोली-मुलुंड मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे बेलापूरसह एेरोली आणि मुलुंडमध्ये वाहनांची प्रचंड कोंडी झाली आहे. त्यातच ऐरोली टोलनाक्यावर सुरू असलेल्या टोलवसुलीमुळे प्रवाशांच्या खिशालाही खार लागत आहे. शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांनी हा टोलनाका बंद पाडल्यानंतरही सकाळी वसुली पुन्हा सुरू झाली. त्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आ. एकनाथ शिंदे यांनी या टोलनाक्यावर कारवाई करण्याचे संकेत देत एकाच ठिकाणी टोल भरण्याचं आवाहन प्रवाशांना केलं आहे.


जम्बोब्लाॅकचं काम

मध्य रेल्वेकडून सीवूड ते उरण असा नवा मार्ग तयार करण्यात येत आहे. या मार्गाच्या कामासाठी शुक्रवारपासून नेरूळ ते बेलापूरदरम्यान ७२ तासांचा जम्बोब्लाॅक घेण्यात आला आहे. रविवारी रात्रीपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्याचवेळी शुक्रवारी सकाळपासूनच कळवा-विटावा-एेरोली-बेलापूर रस्ता बंद करण्यात आला. या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी पेव्हर ब्लाॅक बसवण्यात येत आहेत. या कामासाठी तब्बल ४ दिवस हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. हा रस्ता बंद झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक पटणी-एेरोली रस्त्याने एेरोली नाॅलेज पार्क मार्गे वळवण्यात आल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.


टोलवसुली का?

कळवा-विटावा रस्त्यावर टोलच नाही. आता पर्यायी मार्गाचा वापर करताना एेरोली-मुलुंड टोलनाक्यावर प्रवाशांना टोल द्यावा लागत आहे. आधीच वाहतूककोंडी त्यात टोल भरण्यासाठी रांगा लागत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे टोलचा नाहक भुर्दंड का? असा सवाल करत टोल घेऊ नये, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


टोल पुन्हा सुरू

हीच मागणी घेऊन स्थानिक मनसे कार्यकर्ते शुक्रवारी दुपारी रस्त्यावर उतरले आणि एेरोली टोलनाक्यावर आंदोलन करत टोल बंद केला, अशी माहिती नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. संध्याकाळनंतर पाेलीस बंदोबस्तात टोल न घेता वाहने सोडण्यात येत असली, तरी सकाळी पुन्हा टोल वसुलीला सुरूवात झाली. मात्र या प्रकाराची दखल घेत ठाण्याचे पालकमंत्री आ. एकनाथ शिंदे यांनी टोल वसुली थांबवण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले. तसेच टोल वसुली होत असेल, तर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही दिलं.


अतिरिक्त गाड्यांची सोय

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी 'एनएमएमटी'ने अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत. तरीही नवी मुंबईकर-ठाणेकरांना वाढत्या गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी आणि रविवारीही प्रवाशांचे हाल सुरू राहण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

फिरायला बाहेर निघालेले मुंबईकर वाहतूककोंडीने झाले 'जाम'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा