Advertisement

ट्राफिकचे नो टेंशन, घाटकोपर ते ठाणे होणार डबल डेकर रस्ता

गर्दीच्या वेळेत महामार्गावरील अनेक जंक्शनवर वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

ट्राफिकचे नो टेंशन, घाटकोपर ते ठाणे होणार डबल डेकर रस्ता
SHARES

मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) डबलडेकर मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा 13 किलोमीटर लांबीचा डबल डेकर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर बांधला जाणार आहे. हा मार्ग घाटकोपरच्या छेडानगर जंक्शनपासून सुरू होऊन ठाण्यातील आनंद नगरपर्यंत जाईल.

एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डबल डेकर रस्त्याचा  अभ्यास पूर्ण झाला आहे. लवकरच त्याचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा मुंबईतील सर्वात लांब डबलडेकर रस्ता असेल, ज्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या वाहतुकीसाठी ३-३ लेन असतील. प्राधिकरणाच्या १५४ व्या बैठकीत पूर्व द्रुतगती मार्ग वाहतूकमुक्त करण्याच्या या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉर ईस्टर्न फ्रीवेला जोडल्यानंतर वाहने ठाण्यापासून घाटकोपरपर्यंत वेगाने न थांबता प्रवास करू शकतील.

ईस्टर्न एक्स्प्रेस वे सायन जंक्शनपासून ठाण्यातील माजिवडा जंक्शनपर्यंत पसरलेला आहे. गुजरात आणि नाशिकच्या दिशेने येणारी वाहने या महामार्गावरून मुंबईत प्रवेश करतात. महामार्गावरून दर तासाला हजारो वाहने ये-जा करतात.

गर्दीच्या वेळेत महामार्गावरील अनेक जंक्शनवर वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. छेडानगर जंक्शनवर सर्वाधिक वाहनांची वर्दळ दिसून येते. गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे, परिणामी वाहतूक कोंडीची समस्या कालानुरूप वाढत आहे.

MMR क्षेत्रामध्ये नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सोपे व्हावे यासाठी MMRDA एकाच वेळी अनेक योजनांवर काम करत आहे. प्रकल्पांना निधी देण्यासाठी, एमएमआरडीएने मुंबईतील सर्व टोलनाक्यांवरील टोल वसुलीचे अधिकार सरकारकडे मागितले आहेत.

शिवडी-न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, शिवडी-वरळी कनेक्टर, विरार-अलिबाग कॉरिडॉर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी-लिंक आणि वांद्रे-वरळी सी-लिंक एकमेकांना जोडण्यात येणार आहेत.

मुंबई ते नवी मुंबई जोडणारा 22 किमी लांबीचा MTHL प्रकल्प जवळपास 90 टक्के पूर्ण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला MTHL वर वाहनांची हालचाल सुरू होण्याची अपेक्षा आहे.

एमटीएचएलकडून मुंबईकडे येणारी वाहने शिवडीहून ईस्टर्न फ्रीवेने काही मिनिटांत घाटकोपरला पोहोचतील. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर अल्पावधीतच अधिक वाहने आल्याने महामार्गावरील वाहतूक समस्या भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते. अशा स्थितीत डबल डेकर मार्ग भविष्यातील गेम चेंजर ठरेल.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा