पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात

Mumbai
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात
See all
मुंबई  -  

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील पूर्व आणि पश्चिम दुतगती महामार्ग मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू असतानाच आता हे दोन्ही मार्ग एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात येत आहेत. हे दोन्ही मार्ग पुढील पाच वर्षांसाठी एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात येत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी याबाबतचा आदेशच जारी केला आहेत. त्यामुळे दर पावसाळ्यात टीकेचे धनी होणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे दोन्ही मार्ग सुपूर्द करून खड्डयांचे टेन्शन एमएमआरडीएच्या गळ्यात टाकले आहे.

मेट्रो रेल्वेचे जाळे संपूर्ण मुंबईत पसरले जात आहे. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो रेल्वे प्रकल्पानंतर आता पुढील टप्प्याचे काम सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून अंधेरी ते दहिसरपर्यंत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर एमएमआरडीएच्यावतीने विविध मेट्रो प्रकल्प तसेच उड्डाणपुलांची कामं सुरू असल्यामुळे हे दोन्ही रस्ते पाच वर्षांसाठी हस्तांतरीत करण्यात यावेत, अशी मागणी एमएमआरडीएने केली होती. त्यामुळे याबाबतचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. मात्र, यावर 13 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग पुढील पाच वर्षांसाठी हस्तांतरीत करण्यात यावा, याबाबतचे परिपत्रक त्यांनी जारी केले आहे.

महापालिका हद्दीतील पूर्व आणि पश्चिम दुतगती मार्ग हे शासन निर्णयान्वये पाच वर्षांच्या कालावधीसाठी एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्यात येत आहेत. या हस्तांतरणाची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) व एमएमआरडीएचे प्राधिकृत अधिकारी यांनी तात्काळ करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची डागडुजी न झाल्यामुळे या रस्त्यावर वारंवार खड्डे पडून वाहतुकीला अडचण निर्माण होते. परंतु मुंबईतील सर्व रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती केल्यानंतरही या द्रुतगती महामार्गावरील खड्डयांमुळे महापालिकेला टिकेचे धनी बनवले जात असे. त्यामुळे या मार्गावरून महापलिकेतील सत्ताधारी पक्षाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले जात असे. मागील पावसाळ्यात या दोन्ही मार्गावर खड्डे पडणार नाहीत, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देत पावसाळ्यापूर्वी या मार्गांची दुरुस्ती केली जाईल, असे सांगितले होते. परंतु या पावसाळ्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने हे दोन्ही मार्ग एमएमआरडीएकडे सुपूर्द करून आपल्यावरील जबाबदारी झटकली आहे. या मार्गावरील खड्डयांमुळे याची जबाबदारी महापालिकेवर निश्चित करण्यासाठी हे दोन्ही मार्ग महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू होत्या. परंतु ऐनवेळी शासनाने निर्णय बदलून प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला हे मार्ग दिल्यामुळे येत्या पावसाळ्यात एमएमआरडीला याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.