Advertisement

'ती' मुंबई-पुणे विद्युत बस मुंबईकरांच्या सेवेत रूजू

मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता विद्युत बसमधून प्रवास करता येणार आहे.

'ती' मुंबई-पुणे विद्युत बस मुंबईकरांच्या सेवेत रूजू
SHARES

मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता विद्युत बसमधून प्रवास करता येणार आहे. ईवे ट्रान्स या खासगी कंपनीची वातानुकूलित मुंबई-पुणे विद्युत बस मुंबईकरांच्या सेवेत रूजू झाली आहे. पुरीबस या नावानं मुंबई-पुणेदरम्यान विद्युत बससेवा सुरू करण्यात आली आहे.

या सेवेत सद्यस्थितीत २ बस दाखल करण्यात आल्या असून, महिनाअखेरपर्यंत ५ पुरीबस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. ही बस एका चार्जिंगमध्ये ३५० किमीपर्यंत प्रवास पूर्ण करते. बोरिवली-कांदिवलीसह तब्बल २० ठिकाणी बसमध्ये प्रवेश करण्याची मुभा असणार आहे. ही बस शहरातील महत्त्वाच्या वस्त्यांनजीक थांबणार असल्याने घर ते बस स्थानकादरम्यानचा प्रवासवेळ व खर्च वाचणार आहे.

सर्वाधिक वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे मार्गावर ईवे ट्रान्स या खासगी कंपनीने विजेवर धावणारी पुरीबस सुरू केली आहे. बोरिवली-मालाडपासून सुरू होणारी बस स्वारगेट, कोथरूडमार्गे पुण्यात दाखल होईल. या बसचे तिकीट ४९९ रुपये असणार आहे.

बोरिवली येथील गोकुळ हॉटेल, सुकूरवाडी, राष्ट्रीय उद्यान पूल, कांदिवली येथील समतानगर पोलिस चौकी, मालाड येथील शांताराम तलाव आणि पठाणवाडी, गोरेगावमधील बी४ फ्लायओव्हर, अंधेरीतील बिस्लेरी कंपाऊंड, विलेपार्लेतील हॉटेल सहारा, सांताक्रूझ येथील शिक्षक कॉलनी, वांद्रे कलानगर बस स्टॉप, सायन रेल्वे स्थानक आणि चुनाभट्टी, चेंबूरमधील योगी हॉटेल आणि मैत्री पार्क या ठिकाणांहून प्रवाशांना या बसमध्ये प्रवेश करता येणार आहे. त्याचबरोबर सीबीडी बेलापूर, वाशी, नेरुळ, खारघर या ठिकाणांहूनदेखील प्रवास सुरू करणे शक्य होणार आहे. पुणे शहरातील तळेगाव, वाकड, हिंजेवाडी, चांदणी चौक, कोथरूड, स्वारगेट आणि पुणे स्थानक इथं उतरण्याची सुविधा प्रवाशांना असणार आहे.

या सुविधा उपलब्ध

  • आरामदायक पुश बॅक सीट
  • मनोरंजनासाठी वाय-फाय
  • बसमध्ये टीव्ही
  • अत्याधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टम
  • प्रत्येक सीटजवळ इन-बिल्ट यूएसबी चार्जर
  • पॅनिक अलार्म सिस्टम व आपत्कालीन प्रकाश व्यवस्था
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा