Advertisement

Mumbai local train: ‘या’ कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून आता रेल्वे मंत्रालयाने सहकारी आणि खासगी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना देखील मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा दिली आहे.

Mumbai local train: ‘या’ कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा
SHARES

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच आता रेल्वे मंत्रालयाने सहकारी आणि खासगी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना देखील मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. यासंदर्भातील संयुक्त परिपत्रक पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने शनिवार १९ सप्टेंबर रोजी जारी केलं आहे. (employees of Cooperative & Private banks can travel by special suburban rail services in Mumbai)

राज्य सरकारच्या विनंतीनुसार सद्यस्थितीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार लोकलची संख्या वाढवताना त्यांना प्रवासाची मुभा देखील देण्यात येत आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार इतर महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची अडचण होऊ नये म्हणून त्यांनाही लोकलमधून प्रवासाला परवानगी देण्यात येत आहे. 

हेही वाचा- पश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० फेऱ्या वाढणार

त्याप्रमाणे खासगी आणि सहकारी बँकांमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांना विशेष लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. राज्य सरकारच्या विनंतीनंतर तसंच रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या परवानगीनंतर ही मुभा देण्यात येत असल्याचं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने संयुक्त पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. 

खासगी आणि सहकारी बँकांमधील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांना विशेष लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. या निवडक १० टक्के बँक कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारकडून स्थानकात प्रवेशासाठी लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल. महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील, असं या पत्रकात रेल्वेकडून नमूद करण्यात आलं आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नसेल. त्यामुळे अन्य कोणीही रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये. प्रवाशांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावं. प्रवासादरम्यान मास्क वापरावा, असेही नमूद करण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय लोकलबाबतच्या इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा