Advertisement

लोकल सुरू करणं म्हणजे 'कोरोना'ला आमंत्रण!

लोकल सुरू झाल्यास कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल सुरू करणं म्हणजे 'कोरोना'ला आमंत्रण!
SHARES

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायसनं मुंबईत शिरकाव केला. सुरूवातीला कमी प्रमाणात असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळू वाढत गेला. त्यामुळं कोरोनाच्या संसर्गापासून मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं. त्यानुसार, मार्च महिन्यात संपुर्ण मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं. तब्बल ३ महिने मुंबईत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. यावेळी मुंबईकरांना नियमावली आखून देण्यात आली होती. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी मुंबईकरांना देण्यात आली होती, वेळेचं बंधनही घालून देण्यात आलं होतं. त्याशिवाय मुंबईची लाइफलाइन लोकलही पहिल्यांदाच एका व्हायरसमुळं बंद ठेवण्यात आली. तब्बल ३ महिन्यांपर्यंत ही सेवा बंद होती. मात्र, टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊनमध्ये 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत शिथिलता आणण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर अनेक सुविधा, व्यवसाय सुरू करण्यात आले. अनलॉकमुळं मुंबईच्या रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढू लागली. हळुहळू वाहतुकही सुरळीत सुरू करण्यात आली. राज्यांतर्गत वाहतुकीला सुरूवात करण्यात आली. परंतु, या शिथिलतेनंतर मुंबईत कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, इतर परिसरात संसर्ग वाढत आहे. मागील महिन्यात मुंबईत गणेशोत्सवही साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा आवाहन केलं होतं. परंतु, अनेक मुंबईकरांनी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी बाजारपेठेत, फुलमार्केटमध्ये प्रचंड गर्दी केली होती.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जातोय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकार व महापालिकेनं केलं. त्यामुळं लोकलनं केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत लोकल फेऱ्या कमी पडत आहेत. त्यामुळं लोकलही प्रवाशांनी भरून धावत आहे. अशात सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देणं म्हणजे गर्दीमध्ये आणखी भर घालण्या सारखं. एकाच ठिकाणी गर्दी केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकल सुरू झाल्यास कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

येत्या १ नोव्हेंबरपासून मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा, कार्यालये आणि १ जानेवारीपासून शाळा सुरू करता येऊ शकेल, असा विश्वास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं (TIFR) व्यक्त केला. यासंदर्भातील एक अहवाल देखील संस्थेनं मुंबई महापालिकेला सोपवला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधताना कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याची माहिती दिली. त्यामुळं लोकल नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबईची लाइफलाइन लोकल सेवाही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली. त्यामुळं इतर कर्मचारी वर्गानं रेल्वेच्या कारभारावर टीका करत नाराजी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळं अनेक प्रवाशी संघटनांनी सामान्य प्रवाशांनाही लोकल प्रवास उपलब्ध करावा अशी मागणी केली. सामान्य प्रवाशांनीही लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी केली. पश्चिम रेल्वेच्या विरार, नालासोपारा स्थानकात लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलं.

हेही वाचा - मुंबईतील लोकल ट्रेन, कार्यालयं १ नोव्हेंबरपासून सुरू करा, महापालिकेकडे अहवाल सादर

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधताना मुखपट्टी लावणं, सुरक्षित अंतर व हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करूनच कोरोनापासून सुरक्षित राहता येईल याचा पुनरुच्चार करत, येत्या मंगळवारपासून राबविण्यात येणाऱ्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांनी योगदान दिल्यास कोरोना नियंत्रणाचं लक्ष्य साध्य करता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यात १५ सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचणार आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघात पथकं नेमण्यात येणार असून, ही पथकं महिनाभरात किमान २ वेळा आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहेत. यात कुटुंबातील ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या कुणाला काही आरोग्याविषयी तक्रार असल्यास त्यांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून पुढील उपचार देण्यात येणार आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास अशक्यच, आर्थिक खर्चाच चढता क्रम कायम


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा