Advertisement

पुढील महिनाभरात सर्व टोल नाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी

राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे.

पुढील महिनाभरात सर्व टोल नाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी
SHARES

पुढील महिनाभरात मुंबईच्या वेशीवरील सर्व टोल नाक्यांवर १०० टक्के फास्टॅगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं आता सर्वच टोल नाक्यावर फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गतवर्षी सर्व महामार्गावर फास्टॅग यंत्रणा बंधनकारक करण्यात आली. त्यानंतर एमएसआरडीसीने आपणहून पुढाकार घेत मुंबईच्या वेशीवर ही यंत्रणा बसविण्याचे आदेश टोल कंत्राटदारास दिले. मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड (लालबहादूर शास्त्री मार्ग), मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या पाच ठिकाणी पथकर नाके आहेत. या ५ ही ठिकाणी १ जानेवारी २०२० पासून फास्टॅग यंत्रणा बसविण्याचे आदेश एमएसआरडीसीने दिले होते.

त्या अनुषंगाने काम सुरू झाले, मात्र टाळेबंदीमुळे यासाठी आवश्यक असणारे सेन्सर थायलंड येथून येऊ शकले नाहीत. अखेरीस दहिसर येथील पथकर नाका वगळता चार नाक्यांवर ऑक्टोबरच्या मध्यावर फास्टॅग यंत्रणा कार्यरत झाली. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक ठिकाणी तीन मार्गिकांवर फास्टॅग बसविण्यात आले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतूवर फास्टॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईच्या वेशीवरील सर्व पथकर नाक्यांवर १०० टक्के  फास्टॅग यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून, तेथे १०० टक्के  फास्टॅगची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सध्या सागरी सेतूवर मर्यादित मार्गिकाच हायब्रीड स्वरूपात कार्यरत आहेत. मात्र अद्यापही अनेकांनी फास्टॅग घेतले नसल्याने या मार्गिकेवर गर्दी झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच फास्टॅग वेळोवेळी रिचार्ज करणे गरजेचे आहे. अनेक फास्टॅगधारक रिचार्ज करत नसल्याने अडचणी येत असून, वेगवान प्रवासासाठी वाहनचालकांनी फास्टॅग रिचार्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सागरी सेतूवर दुहेरी प्रवास करणाऱ्या वाहनास मिळणारी सुविधा यापुढेही कार्यरत राहणार आहे. पहिल्यांदा सागरी सेतूवरून जाताना ७० रुपये कापले जातील, त्यानंतर रात्री १२ च्या आत परतीचा प्रवास केल्यास केवळ ३५ रुपयेच कापले जातील. म्हणजेच दुहेरी प्रवासासाठी १४० ऐवजी केवळ १०५ रुपये टोल फास्टॅगद्वारे कापला जाईल. तसेच १७५ रुपयांमध्ये २४ तासांत अमर्यादित प्रवासाची तरतूद सुरू राहणार असून, त्यासाठी ३ फेऱ्यांमध्ये (७०+३५+७० रुपये) कापले जातील. त्यानंतर रात्री १२ च्या आत कितीही वेळा प्रवास करता येईल.

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर २६ जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक केल्यानंतर आता या मार्गावरील ईटीसीधारकांना फास्टॅग वापरण्यास सांगितले जात आहे. एकाच वेळी फास्टॅग आणि ईटीसी असे दोन्ही सेन्सर कार्यरत ठेवल्यास गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे ईटीसीधारकांना फास्टॅग घेण्याबाबत टोल कंत्राटदारांनी आधीच कळवले आहे. ईटीसीवरील उर्वरित रक्कम फास्टॅगमध्ये किंवा धारकाच्या खात्यावर वळती केली जाईल.



हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला केवळ ७५० कोटींचे अनुदान

मुंबई लोकलच्या दारावर तरूणानं टेकलं डोकं, आनंद महिंद्रा झाले भावूक


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा