'द बर्निंग' मोनोरेल


SHARE

मुंबईकरांना गारेगार आणि सुपरफास्ट प्रवास देणारी मोनोरेल खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण गुरुवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास मनोरेलला आग लागली. इलेक्ट्रिक ब्रेक फेल झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.


कोणतीही जीवितहानी नाही

पहाटेची वेळ असल्याने मोनोरेल पुर्णतः रिकामी होती. त्यामुळे कोणती जीवितहानी यावेळी झाली नसल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. मात्र अचानकपणे लागलेल्या या आगीमुळे मोनोरेलच्या सुरक्षेचा, प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.कशी लागली आग?

पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी चेंबूर मोनोरेल स्थानकावरून ही मोनोरेल वडाळ्याच्या दिशेने निघाली होती. मोनोरेल म्हैसूर कॉलनी स्थानकावर पोहोचली त्यादरम्यान 5 वाजून 20 मिनिटांनी अचानक मोनोच्या शेवटच्या डब्यात आग लागली. अग्निशमन दलाचे 3 फायर इंजिन आणि 3 वॉटर टॅंकर त्वरित घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या 40 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवली.

पहाटेची वेळ असल्याने मोनो रिकामी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या घटनेची चौकशी एमएमआरडीएकडून होणार असल्याची शक्यता आहे. याचा अंतिम निर्णय दुपारपर्यंत होण्याची शक्यता असल्याचे कवठकर यांनी स्पष्ट केले आहे.


मोनोची वाहतूक ठप्प

या आगीमुळे मोनोरेलची वाहतूक पहाटे सव्वा पाचपासून पूर्णतः ठप्प आहे. ही वाहतूक व्यवस्था लवकरच सुरळीत करण्यात येईल असे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या