ट्रेनमधील चहा-काॅफी महागणार!


ट्रेनमधील चहा-काॅफी महागणार!
SHARES

चहा आणि काॅफीचे घोट घेत रेल्वे प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. होय. रेल्वेत मिळणाऱ्या चहा आणि काॅफीच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे बोर्डाने काढलेल्या परिपत्रकात चहा-काॅफी स्टील किंवा काचेच्या ग्लासमध्ये न देता डिस्पोजल कपमध्ये देण्याचं तसंच चहा-काॅफीच्या किंमती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


किती रुपयांना मिळणार चहा?

रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा 'आयआरसीटीसी'चा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. ही नाममात्र दरवाढ आहे. दरवाढीनुसार आता टी बॅगसोबत मिळणारा १५० मि.ली. चहा आणि इन्स्टंट काॅफी पावडरची १५० मि.ली. काॅफी १७० मि.ली.च्या डिस्पोजल कपमध्ये देण्यात येईल.


साधा चहा स्वस्तच

नव्या परिपत्रकानुसार ७ रुपयांना मिळणारा हा चहा आता १० रुपयांना मिळेल. तर साध्या चहाची किंमत मात्र तीच राहणार आहे. हे परिपत्रक १८ सप्टेंबर रोजी काढण्यात आलं होतं.

आयआरसीटीसी साधारणत: ३५० ट्रेनमध्ये 'पेंट्री कार'द्वारे खाद्यपदार्थांची सेवा पुरवते. राजधानी आणि शताब्दी या ट्रेनमधील खाद्यपदार्थांच्या पॅकेजमध्ये कुठलेही बदल केले जाणार नाहीत. कारण या सुपरफास्ट ट्रेनमधील खाद्यपदार्थांचे पैसे आधीच घेतले जातात.

संबंधित विषय