Advertisement

कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०२ फेऱ्यांचं नियोजन


कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०२ फेऱ्यांचं नियोजन
SHARES

कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झालं आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीनं कोकण रेल्वेनं गणेशोत्सवाच्या काळात २०२ फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण आधीच फुल्ल झाल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवण्यात आवली आहे. तसंच प्रवाशांच्या मागणीनुसार अजूनही काही फेऱ्या वाढवण्याची शक्यता आहे.


अतिरिक्त कर्मचारीदेखील पुरवणार

गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस उरले आहे. यानिमित्ताने मुंबईत नोकरी व्यवसाय करणारे अनेक कोकणवासीय मोठ्या संख्येनं कोकणात येतात. गणेशोत्सवाच्या काळात तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरीसह पाच प्रमुख स्थानकांवर या दिवशी जादा तिकीट खिडक्यांसह अतिरिक्त कर्मचारीदेखील पुरवले जाणार आहेत.


प्रवाशांना लाभणार सुरक्षित प्रवास

यंदाच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वेनं गणेशभक्तांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचं ध्येय डोळयांसमोर ठेवलं असून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाकरता प्रत्येक रेल्वे स्थानकावर २०७ आरपीएफचे जवान आणि ६० होमगार्डची पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या रेल्वे स्थानकावर प्रवाशांकरता प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रमुख रेल्वे स्थानकावर औषधांचे विशेष काउंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्याशिवाय अनेक रेल्वे स्थानकावरील टी- स्टॉल केंद्रावर जनता खाना व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असून पिण्याच्या पाण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे.


रेल्वेच्या जादा फेऱ्या

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेने गणेशोत्सव काळात केलेल्या जादा रेल्वे फेऱ्यांना बहुतांश स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे येथून रत्नागिरी, सावंतवाडी, थिवीम, मडगाव दरम्यान जादा रेल्वे फेऱ्या धावणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा