Advertisement

लोअर परळ पूलावर फेब्रूवारीत पडणार हातोडा

दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा लोअर परळ इथं नवीन पुलाचं बांधकाम सुरू करण्याचा मार्ग आता लवकरच मोकळा होणार आहे.

लोअर परळ पूलावर फेब्रूवारीत पडणार हातोडा
SHARES

दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा लोअर परळ इथं नवीन पुलाचं बांधकाम सुरू करण्याचा मार्ग आता लवकरच मोकळा होणार आहे. कारण पश्चिम रेल्वेने लोअर परळच्या नव्या पुलाच्या बांधकामासाठी नुकत्याच निविदा काढल्या आहेत. त्यानुसार दोन महिन्यांत कंत्राट अंतिम करत शक्य तितक्या लवकरच जुना पूल पाडून नव्या पुलाच्या बांधकामाला सुरूवात करण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे फेब्रुवारीत लोअर परळ पुलावर हातोडा पडण्याची शक्यता आहे.


बांधकामासाठी निविदा

लोअर परळ पुल धोकादायक झाला असल्यानं काही महिन्यांपासून हा पुल वाहतुकीसाठी-पादचार्यांसाठी बंद करण्यात आला आहे. हा पुल बंद असल्यानं वाहनचालक-प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हा पुल पाडत नव्या पुलाची उभारणी करण्याच्या कामाला आता अखेर पश्चिम रेल्वेने वेग दिला आहे. त्यानुसार नव्या पुलाच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या असून बांधकामाचं कंत्राट ८५ कोटी रुपयांच आहे.


दहा महिन्यांत काम

फेब्रुवारीमध्ये जुन्या पुलाच्या पाडकामाला सुरूवात करत त्यानंतर त्वरीत नव्या पुलाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेसाठी राखीव जागा सोडण्यासाठी पुलाची रूंदी वाढवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आता पुल ८५ मीटर लांबीचा आणि ३७ मीटर रुंदीचा असणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पादचार्यांसाठी दोन मीटरच्या स्वतंत्र मार्गिका असणार आहेत. दरम्यान पुलाचं बांधकाम सुरू झाल्यापासून दहा महिन्यांत पुलाचं काम पूर्ण करत हा नवीन पूल सेवेत दाखल करण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे. त्यामुळे आता लवकरच वाहनचालक-प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


फेब्रुवारीत मेगाब्लाॅक

जुन्या पुलाचे गर्डर व पिलर काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ ते १५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार-रविवार जोडून हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान, बोरिवली, विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणाऱ्या लोकल गाड्या दादर स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. मात्र, किती गाड्या दादर स्थानकात थांबवणार याबाबतचे नियोजन सुरू आहे. या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय गाडय़ा व एक्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा