Advertisement

महिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती

मुंबईतील महिला प्रवाशांना उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशा आशयाचं विनंती पत्र पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडून रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात आलं आहे.

महिला लोकल प्रवाशांसाठी राज्य सरकारची रेल्वेला पुन्हा विनंती
SHARES

मुंबईतील महिला प्रवाशांना उपनगरीय लोकल ट्रेनने प्रवास करण्याची लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशा आशयाचं विनंती पत्र पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडून रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात आलं आहे. यावरील निर्णय रेल्वेकडून अद्याप प्रलंबितच ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे समस्त महिला प्रवाशांचं लक्ष सध्या रेल्वेच्या मंजुरीकडे लागलं आहे.

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या नावे हे विनंती पत्र पाठवलं आहे. सर्व महिलांना योग्य तिकीटाच्या आधारे सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ वाजेनंतर गर्दी पिक अवर नसलेल्या वेळेत लोकल ट्रेनने प्रवास करू देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पुन्हा एकदा रेल्वेला करण्यात आली आहे. त्यासाठी १६ आॅक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्राची आठवण देखील करून देण्यात आली आहे. 

हेही वाचा- मुंबईत महिलांना लोकल प्रवासाची परवानगी कुणामुळे नाही?

राज्यातील ठाकरे सरकारने नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने १७ आॅक्टोबरपासून मुंबईतील महिला प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देऊ केली होती. परंतु अजूनही राज्य सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळू शकलेली नाही. महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची रेल्वेची तयारी आहे, परंतु अद्याप राज्य सरकारकडून कार्यपद्धती निश्चित न केल्याने परवानगी रखडल्याचा दावा रेल्वे प्रशासन करत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या दबावाखाली रेल्वे अधिकारी ही परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

दुसरीकडे लोकल प्रवासाची आवश्यकता असलेल्या इतर प्रवाशांचाही सरकारने विचार करावा आणि कार्यालयीन वेळ निश्चित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले आहेत. या वादामुळे येत्या काळात सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

(maharashtra government wrote a letter to railway authority over permission for women passengers travel in mumbai local train)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा